Rupali Chakankar hits back at Supriya Sule
Rupali Chakankar hits back at Supriya Sule

  NCP Crisis : राष्ट्रवादीची लढाई आता निवडणूक आयोगात पोहचल्यानंतर आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्याचबरोबर आमदार अपात्रतेची मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आल्यानंतर अजित पवार गटानेसुद्धा आमदार अपत्रातेची मागणी केली होती.
  सुप्रिया सुळे यांना सोशल मीडियावर केले जातेय ट्रोल
  भाजपा आणि आमच्यामध्ये वैचारिक लढाई आहे. या लढाईत प्रफुल्ल पटेल भाजपाच्या बाजूने आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना अपात्र करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे अजित पवार हे जेव्हा जुलै महिन्यात उपमुख्यमंत्री झाले तेव्हा खासदार सुनील तटकरे यांना अपात्र करण्याची मागणी आम्ही केली. मात्र, श्रीनिवास पाटील यांनी अपात्र होण्यासारखे काहीही केलेले नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. ज्यानंतर सुनील तटकरेंसह अजित पवार गटाकडून सुप्रिया सुळेंवर तुफान टीका सुरू झाली. सुप्रिया सुळे यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येतं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही एक कविता पोस्ट करुन सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे.
  काय आहे रुपाली चाकणकर यांनी पोस्ट केलेली कविता?
  तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या जिवावर निवडून येतात त्यांनाच विचारतात प्रश्न…?
  दादासमोर नाक उचलून
  धाकुटी विचारे
  तू कुठं काय केलंस?
  चंदनाच्या खोडाला
  सहाण विचारे
  तू कुठं काय केलंस?
  तो झिजला, पण विझला नाही
  देहाची कुडीच विचारे
  तू कुठं काय केलंस?
  पाया भरला, विटा-वासे तोलून धरले
  घराचा उंबराच विचारे
  तू कुठं काय केलंस?
  नांगर धरला, शेती केली
  भुईला भीमेचं भान दिलं
  मुसक्यांची गाठ विचारे
  तू कुठं काय केलंस?
  घामाला दाम दिला
  कष्टाला मान दिला
  रक्ताचं पाणीच विचारे
  तू कुठं काय केलंस?
  प.पा.

  अशी कविता पोस्ट करत रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. अजित पवार गटाने खासदार श्रीनिवास पाटील यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. यावरून सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटावर टीका केली होती. याला सुनील तटकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
  सुनील तटकरे काय म्हणाले होते?
  “अजित पवारांनी ३० वर्षे बारामती शहर उभे केले. दादा… दादा… दादा म्हणत ज्यांचं राजकीय आयुष्य गेलं. मग, अजित पवारांविरोधात याचिका दाखल करताना राजकीय विचार वेगळे असल्याचं सुचलं. श्रीनिवास पाटलांबद्दल मला आदर आहे. पण, राजकीय लढाईत वयोमर्यादा हा विषय नाही,” असं सुनील तटकरेंनी म्हटले.