गोरगरीबांचे घराचे स्वप्न होणार साकार, महाआवास अभियानातंर्गत ग्रामीण भागात ५ लाख घरे बांधण्याचा राज्य सरकारचा निर्धार – हसन मुश्रीफांची घोषणा

महाआवास अभियान टप्पा-२ मध्ये ५ लाख घरे(5 Lakh Homes By Maharashtra Government) बांधण्याचे माझे उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्याचा आज संकल्प करून महाराष्ट्र राज्य अन्य राज्याच्या तुलनेत अधिक सक्षमपणे आणि गतिमानतेने पुढे नेऊ, असा निर्धार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांनी केला.

    मुंबई : गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सरकारचे असून राज्यातील जनतेकरिता शासकीय अधिकाऱ्यांनी कमीत कमी वेळेत ती घरे बांधून ते स्वप्न पूर्ण करावे. या महाआवास अभियानामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना स्वत:च्या मालकीचे पक्के घर मिळणार आहे. महाआवास अभियानाच्या(Mahawas Abhiyan) पहिल्या टप्प्यात मिळालेले यश पाहता महाआवास अभियान टप्पा-२ मध्ये ५ लाख घरे(5 Lakh Homes By Maharashtra Government) बांधण्याचे माझे उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्याचा आज संकल्प करून महाराष्ट्र राज्य अन्य राज्याच्या तुलनेत अधिक सक्षमपणे आणि गतिमानतेने पुढे नेऊ, असा निर्धार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांनी केला.

    महाआवास अभियान- ग्रामीण टप्पा-२ चा शुभारंभ
    महाआवास अभियान- ग्रामीण टप्पा-२ चा शुभारंभ आज ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते मंत्रालयातून करण्यात आला. या राज्यस्तरीय शुभारंभ प्रसंगी ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ.राजाराम दिघे याचबरोबर दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील विभागीय आयुक्त, आदिवासी विकास आयुक्त, उपायुक्त (विकास), जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, गटविकास अधिकारी व सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच तसेच ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

    बेघरांना सर्व सुविधांनी युक्त असा हक्काचा निवारा
    आपल्या अध्यक्षीय भाषणात मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील ग्रामीण भागात ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून विविध ग्रामीण आवास योजनांमधून शासन बेघरांना सर्व सुविधांनी युक्त असा हक्काचा निवारा पुरविण्यात यशस्वी होत आहे. याचाच भाग म्हणून २० नोव्हेंबर२०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत राबविलेल्या महा आवास अभियान – ग्रामीण (टप्पा-१) मध्ये १२६० पेक्षा जास्त बहुमजली इमारती, ६३० पेक्षा जास्त गृहसंकुले तसेच ७५० घरकुल मार्ट सुरू करण्यात आले आहे. याचबरोबर  ५० हजार ११२ भूमीहिन लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या टप्पा-१ मध्ये आपण ४ लाख २५ हजार घरकुले भौतिकदृष्ट्या बांधून पूर्ण केली असून उर्वरित घरकुले तात्काळ पूर्ण करण्यात येणार आहे. महाआवास अभियान टप्पा-२ हा २० नोव्हेंबर २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत असून हे अभियान अधिक गतिमानतेने आणि गुणवत्तेने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.