ग्रामविकास आणि नगरविकास विभाग महावितरणचे मोठे थकबाकीदार – ऊर्जामंत्र्यांच्या वक्तव्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

राज्यातील ग्रामविकास आणि नगरविकास विभागाकडे महावितरणची मोठ्या प्रमाणात थकबाकी (Mahavitran Bill Pending By Rural And Urban Development Department) आहे. राज्य अंधारात गेल्यास त्याला केवळ काँग्रेस (Congress) जबाबदार राहणार नाही, तर ही दोन्ही खाती ज्या राष्ट्रवादी (Rashtrawadi) आणि शिवसेनेकडे (Shivsena) आहेत, ते देखील त्याला जबाबदार राहतील, असा आरोप ऊर्जामंत्र्यानी केला होता.

    मुंबई: आर्थिक संकटात असलेल्या महावितरणला (Mahavitran) ग्रामविकास खात्याकडून पथदिव्याची काही देयके तातडीने भरण्यात येणार आहेत. मात्र काही देयकात त्रुटी असल्याने त्याची पडताळणी सुरू आहे, ते काम पूर्ण होताच ही देयकेही अदा करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif Reply To Energy Minister) यांनी दिली. केवळ आर्थिक अडचणीमुळे राज्य अंधारात जाणे महाविकास आघाडीला न परवडणारे असेल, असेही त्यांनी सांगितले.

    पाचशे कोटींची बिले देण्यासाठी पडताळणी सुरू
    राज्यातील ग्रामविकास आणि नगरविकास विभागाकडे महावितरणची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. त्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. या विभागाकडे आता कोळसा खरेदीलाही निधी नाही. यामुळे राज्य अंधारात गेल्यास त्याला केवळ काँग्रेस जबाबदार राहणार नाही, तर ही दोन्ही खाती ज्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे आहेत, ते देखील त्याला जबाबदार राहतील, असा आरोप ऊर्जामंत्र्यानी केला होता.

    याबाबत विचारले असता ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, पथदिव्याची बिले ग्रामविकास खात्याकडून दिली जाणार आहेत पाचशे कोटींची बिले देण्यासाठी पडताळणी सुरू आहे. ते काम पूर्ण होताच सर्व बिले दिली जातील. केवळ आर्थिक अडचणीमुळे राज्य अंधारात राहणे आम्हाला परवडणारे नाही, त्यामुळे लवकरात लवकर बिले देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.