बलवडीत २५ रोजी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळाचे आयोजन, प्रा. डाॅ. मोहन पाटील संमेलनाध्यक्ष; विठ्ठल साळुंखे उद्घाटक

    विटा : खानापूर  तालुक्यातील बलवडी (भा. ) येथील जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळातर्फे सोमवारी (दि. २५) रोजी ३१ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डाॅ. मोहन पाटील (जयसिंगपूर) संमेलनाध्यक्ष आहेत. शिवप्रताप मल्टीस्टेटचे कार्यकारी संचालक विठ्ठल साळुंखे यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. अशी माहिती संयोजकांनी दिली.
    संमेलन तीन सत्रात होईल. कविवर्य पद्मश्री ना. धो. महानोर साहित्य नगरीमध्ये  संमेलन होईल. पहिल्या सत्रात उद्घाटन सोहळा होईल. प्रा. डाॅ. शरद पाटील नेर्ली स्वागताध्यक्ष असणार आहेत. ‘खंबाटकी ते खाकी’च्या लेखिका शुभांगी पवार प्रमुख पाहुण्या आहेत. यावेळी जोर्तिलिंग वाङमय पुरस्काराने रवी राजमाने यांना गौरविण्यात येणार आहे. तर शाहिर बाळकृष्ण कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा साहित्य पुरस्कार शाहिर अनिता खरात चिंचणी (ता. ‌तासगाव), कृषि शास्त्रज्ञ डॉ. एच. के. पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा कृषी पुरस्कार अशोक काकासाहेब पवार (बलवडी),  इंदुमती आनंदराव पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा आदर्श माता पुरस्कार मनीषा संदीप चिंचकर, कै. मारुती मलू जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार नामदेव गुरव, भि. रा. पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदर्श माध्यमिक शिक्षक पुरस्कार हिम्मतराव मलमे, बी. डी. कुंभार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदर्श कार्यकर्ता प्ररेणा पुरस्कार स्मिता धारुरकर (पुणे) यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

    यावेळी महादेव मलमे, बबन व  वासंती  खंडागळे – पाटील, आनंदराव व वृषाली शिंदे या दाम्पत्यांचा व रानकवी सु.धो. मोहिते यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. दुसऱ्या सत्रात हिम्मत पाटील (नागठाणे) यांचे कथाकथन होईल. तिसऱ्या सत्रात गझलकार  सिराज शिकलगार, (आंधळी) यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे.

     संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. मोहन पाटील यांची साहित्य संपदा
    १९८० पासून प्रा. डॉ.‌पाटील यांनी मराठीत विविध प्रकारात साहित्य लेखन केले आहे. ग्रामीण साहित्य आणि लोकसाहित्य हा त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.‌त्यांच्या साहित्यावर शिवाजी विद्यापीठातील आठ विद्यार्थ्यांनी एम.फील , पीएचडी केली आहे. मराठी ग्रामीण कादंबरीतील स्त्री जीवनाचे चित्रण याविषयावर पीएचडी केली आहे. ‘साखर फेरा’ कादंबरीवर तीन विद्यार्थ्यांनी एम. फील केली आहे. ‌गाव आणि मातेच्या कविता  हा कवितासंग्रह प्रकाशित आहे. शापित वास्तु, कल्पित गोष्टी, घरगाडा हे कथासंग्रह, राजयोग हे वसंतदादा पाटील यांच्या जीवनावर चरित्र प्रकाशित झाले आहे. कोंडमारा, फुलपाखरु, लिगाड, खांदेपालट, बस्तान या पाच कांदबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. ‘पांचुदा’ या नावाने एकत्रित संपादन केले आहे.‌ नांगर आणि इतर एकांकिका प्रकाशित झाल्या आहेत.‌ लोकसाहित्य : संकल्पना आणि स्वरुप , ग्रामीण साहित्य आणि संस्कृती, लोकसाहित्य लेख, आलेख प्रकाशित आहे यासह अन्य विपुल लेखन त्यांनी केले आहे.