पुणे जिल्ह्यातील ग्रामीण पीएमपीएमएल बससेवा होणार पूर्ववत

भोसरी ते घोडेगाव, भोसरी ते मंचर, भोसरी ते कडूस आणि भोसरी ते जुन्नर या सर्व मार्गावरील पीएमपीएमएल बस सेवा पूर्ववत सुरु  करण्यात येत आहे. ऑगस्ट महिनाअखेरपासून या गाड्या सुरू करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष आणि भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे यांनी दिली.

    पिंपरी : भोसरी ते घोडेगाव, भोसरी ते मंचर, भोसरी ते कडूस आणि भोसरी ते जुन्नर या सर्व मार्गावरील पीएमपीएमएल बस सेवा पूर्ववत सुरु  करण्यात येत आहे. ऑगस्ट महिनाअखेरपासून या गाड्या सुरू करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष आणि भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे यांनी दिली.

    एसटी कामगारांचा संप झाल्यानंतर ग्रामीण भागात पीएमपीएमएल प्रशासनाने  बस सेवा सुरू केली. यानंतर ग्रामीण हद्दीतील सुमारे १३ नवे मार्ग सुरू करण्यात आले. यामध्ये भोसरी ते घोडेगाव, भोसरी ते मंचर, भोसरी ते कडूस आणि भोसरी ते जुन्नर आदी मार्ग सुरू करण्यात आले. मात्र, हे मार्ग सुरू केल्यानंतर दोनच महिन्यात कोणतेही कारण न देता प्रशासनाने बस सुविधा बंद केली. यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होत होती. या भांगामध्ये सध्यातरी कोणतेही उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात नाही. या भागातील सुशिक्षित तरुण तसेच आयटीआय झालेले तरुण नोकरीनिमित्त भोसरी, आळंदी, खेड, तळेगाव, चाकण यासारख्या औद्योगिक वसाहतींमध्ये नोकरीनिमित्त दररोज ये-जा करतात. याशिवाय या ग्रामीण भागातील अनेक तरुण प्रशिक्षण, कोचिंग क्लास यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये येत असतात. त्यांना ग्रामीण भागातून ये – जा करण्यासाठी  सार्वजनिक बस सेवा पुरेशा प्रमाणात नाही. त्यामुळे ‘पीएमपीएमएल’च्या या ग्रामीण भागात सुरू झालेल्या बस सेवेमुळे  प्रवाशांना मोठा दिलासा मिळत होता. मात्र ही बस देखील बंद झाल्याने पुन्हा एकदा नागरिकांच्या प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच, ग्रामीण भागात ज्या बस चालू होत्या. त्यावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आक्षेप घेतला होता.

    याबाबत प्रवाशांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे तक्रारी केल्या. तसेच हे मार्ग सुरु करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे यांनी पाठपुरावा केला. भोसरीमधून जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या परिसरातील नागरिक, विद्यार्थी, कामगार वर्ग यांना जोडणाऱ्या पीएमपीची  बस सेवा तात्काळ सुरु करण्यासाठी पीएमपी प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यांनतर आता  बस सेवा पूर्ववत होत आहे.

    महेश लांडगे यांची प्रतिक्रीया

    भोसरीहून मंचर, कडूस, घोडेगाव, जुन्नर हे मार्ग बंद करण्यात आले. यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होत होती. ही बाब पीएमपीएमएल प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात येण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे ही काळाची गरज आहे. ऑगस्ट महिनाअखेरपासून या गाड्या सुरू करण्याचे नियोजन आहे. प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक निर्णयाबाबत समाधान व्यक्त करतो. मात्र, भोसरी ते शिवभूमी शिवनेरी बससेवा केव्हाच बंद न करता कायमस्वरूपी चालूच राहिली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान आणि अखंड महाराष्ट्राचे हृदयस्थान असलेल्या या मार्गावर सार्वजनिक बस सेवा ठेवली पाहिजे, अशा सूचनाही आम्ही प्रशासनाला दिल्या आहेत. असं आमदार महेश लांडगे म्हणाले.