ग्रामीण पर्यटन व्हिलेजमध्ये पाटगावचा समावेश , महाराष्ट्रातील एकमेव गाव; केंद्रीय मंत्रालयाच्या स्पर्धेत नामांकन

केंद्रीय मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज या अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड तालुक्यातील पाटगाव या गावाचे नामांकन झाले. ही बाब कोल्हापूर जिल्ह्याला भूषणावह आहे.

    भुदरगड :  केंद्रीय मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज या अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड तालुक्यातील पाटगाव या गावाचे नामांकन झाले. ही बाब कोल्हापूर जिल्ह्याला भूषणावह आहे. या स्पर्धेत नामांकित असणारे पाटगाव हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव गाव आहे.‘मधाचे गाव पाटगाव’ या उपक्रमामुळे हे गाव राज्यात चर्चेत आले. पाटगाव या गावात कित्येक दशकापासून मधाचा व्यवसाय सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात नैसर्गिक आपत्तीमूळे मध उत्पादनात घट झाली होती. पण अलिकडच्या काळात राज्य शासनाने विशेष लक्ष दिल्याने पाटगाव मधाचे गाव म्हणून विकसित करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न होत आहेत. या उपक्रमास चांगले यश आले आहे.

    देश पातळीवर दखल
    मध पर्यटनातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होवून हे गाव स्वावलंबी होण्याच्या मार्गावर आहे. मधमाशी पालनासाठी या गावात होत असलेल्या या प्रयत्नांची दखल आता देश पातळीवरही घेतली जात आहे. ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे. हा उपक्रम देशातील पथदर्शी उपक्रम ठरेल, असा विश्वास येथील मध उत्पादक, ग्रामस्थांनी व्यक्त केला.