निर्दयी माता-पिता..! गेल्या ९ महिन्यात ११ अर्भकांना टाकले उघड्यावर

पुणे शहरात नुकताच जन्म घेतलेल्या "बाळाला" रस्त्याच्या कडेला, कचऱ्यात, कपड्यांमध्ये अन् खाचखळग्यात टाकून देण्यात येत असल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत. गेल्या ९ महिन्यात ११ अर्भक (बाळांना) अशाप्रकारे उघड्यावर टाकून दिल्याचे प्रकार समोर आले आहे.

  पुणे : आई हा शब्द ऐकला किंवा उच्चारला तरी प्रेम, विश्वास, माया, दया यासोबतच एक स्फुर्तीदायक क्षण देऊन जातो. तस, भारतीय संस्कृतित आई व मुला-मुलीचं नातं हे सगळ्यात सुंदर नातंही मानलं जात. पण, पुण्यासारख्या सांस्कृतिक व स्नेह जपणाऱ्या शहरात निर्दयी माता अन् पिता देखील आहेत. त्यांच्या निर्दयीपणाने पुण्याला गालबोट लावण्याचं काम होत आहे.

  ही निर्दयता इतकी आहे की, पाहणाऱ्याच्या अंगावर शहारे उभा राहतातच, पण, डोळ्यात आश्रूही आणत आहेत. कारण, पुणे शहरात नुकताच जन्म घेतलेल्या “बाळाला” रस्त्याच्या कडेला, कचऱ्यात, कपड्यांमध्ये अन् खाचखळग्यात टाकून देण्यात येत असल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत. गेल्या ९ महिन्यात ११ अर्भक (बाळांना) अशाप्रकारे उघड्यावर टाकून दिल्याचे प्रकार समोर आले आहे. विशेष म्हणजे, यातील एकही माता-पित्याचा शोध अद्याप लागलेला नाही.

  शांतताप्रिय, सांस्कृतिक नगरी, शिक्षणाचे माहेरघर यासोबतच मनमिळावून माणसंच शहर म्हणून ओळखल जात. पण, या शहराला अधून-मधून क्रुरतेच्या घटनांनी गालबोट लागला जातो. शांतताप्रिय शहरात दहशतवादी वास्तव्य करत असल्याचे तर कधी मुलगी अन् आईच वडिलांचा जीव घेतल्याची घटना उघड होतात. मुलाला मारल्याचीही घटना पुण्यात घडल्या आहेत परंतु, त्याहून भयावह म्हणजे, नुकत्याच जन्मलेल्या दोन ते तीन दिवसांच्या अर्भकांना (बाळांना) रस्त्याच्या कडेला टाकून या निर्दयी माता-पितांकडून पळ काढला जात आहे.

  पुण्यात गेल्या काही ‌वर्षांपासून या घटना वाढत चालल्या आहेत. नवजात अर्भकांना रस्त्यांवर, कचऱ्यात टाकून देण्याच्या दिले जात असल्याचे दिसून आले आहे. धक्कादायक म्हणजे, भल्या सकाळीच या घटना उघडकीस येतात. पादचाऱ्यांकडून या बाळांचा रडण्याचा आवाजाने नागरिक त्याठिकाणी पोहचतात आणि त्यानंतर याची माहिती पोलिसापर्यंत पोहचते. परंतु, विशेष बाब म्हणजे, त्यानिर्दयी माता-पित्यांचा शोध मात्र, लागत नसल्याचे वास्तव आहे. पोलिसांकडून या निर्दयी माता-पित्यांचा शोध घेत त्यांना बेड्या ठोकण्याची आवश्यकता आहे. पोलिसांकडून गुन्हा नोंद केला जातो. पण, माता-पिता सापडत नाहीत. आई आणि बाप या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

  पोलिसांचे निरीक्षण…

  नवजात अर्भकांना टाकून देण्याच्या प्रकरणात पोलिसांचे निरीक्षण धक्कादायक आहे. प्रेमसंबंध, अनैतिक संबंध आणि त्या पाल्याला सांभळण्यास असर्थता दाखवत त्यांना रस्त्यावर टाकून दिले जात असावे असे सांगण्यात येते. नुकतेच हडपसर परिसरात एका चार दिवसांच्या नवजात अर्भकाला टाकून दिले होते. त्याच्यावर मांजरीने हल्ला केला होता. वेळेत पोलीस पोहचले आणि त्याला रुग्णालयात दाखल केल्याने त्याचा जीव वाचला. हडपसर भागातील ससाणेनगर येथील गल्ली क्रमांक १३ मध्ये हा प्रकार घडला होता.