ऋतुजा लटके यांची उमेदवारी धोक्यात; अद्याप राजीनामा मंजूर नाही

शिवसेनेतील बंडानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने प्रतिष्ठेची मानली जात आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

    मुंबई : अंधेरी (Andheri) पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परंतु, त्या महापालिकेच्या (BMC) कर्मचारी असल्याने त्यांनी महिन्याभरापूर्वीच आपल्या प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे. मात्र, अद्याप हा राजीनामा मंजूर केलेला नाही. जोपर्यंत लटके यांचा राजीनामा अर्ज मंजूर होत नाही, तोवर त्यांना निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरता येणार नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा अर्ज त्वरीत मंजूर करण्यासाठी शिवसेनेचे (Shivsena) वरिष्ठ नेते पालिका आयुक्तांसह सामान्य प्रशासन विभागाच्या भेटीगाठी घेत आहेत.

    २०१९च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील अंधेरी पूर्व येथून शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके (Ramesh Latke) यांनी विजय मिळवला होता. काही महिन्यांपूर्वी त्यांचे दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. शिवसेनेतील बंडानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने प्रतिष्ठेची मानली जात आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

    ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या अंधेरी के/पूर्व कार्यालयात कार्यरत होत्या. त्यांनी साधारण महिन्याभरापूर्वी राजीनामा दिला आहे. पण त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही.
    ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्याने ठाकरे गटाच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. लटके यांचा राजीनामा लवकर मंजूर करावा यासाठी शिवसेना नेते अनिल परब, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल आणि सामान्य प्रशासनचे सह आयुक्त मिलिन सावंत यांची भेट घेतली.