सचिन वाझेंचा ईडीसमोर मोठा खुलासा – अनिल देशमुखांनी शरद पवारांच्या मनधरणीसाठी केलेली २ कोटींची मागणी

शरद पवारांच्या(Sharad Pawar) मनधरणीसाठी अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) २ कोटी मागितले होते, असे सचिन वाझे यांनी म्हटले आहे.

    सचिन वाझेंनी(Sachin Vaze) ईडीकडे नवा खुलासा केला आहे. शरद पवारांच्या(Sharad Pawar) मनधरणीसाठी अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) २ कोटी मागितले होते, असे सचिन वाझे यांनी म्हटले आहे. शरद पवारांनी वाझेला मुंबई पोलीस दलात पुन्हा घेण्यास विरोध केला होता. त्यानंतर अनिल देशमुखांनी पवारांना राजी करण्यासाठी २ कोटी रुपये खर्च करण्यास सांगितले होते. वाझेने पैसे भरणे शक्य नसल्याचे म्हटल्यावर देशमुखांनी ते वेळेवर देण्यास सांगितले होते, असे वाझेंनी म्हटले आहे.

    सचिन वाझे पुढे म्हणाले की, जुलै २०२० मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १० पोलीस उपायुक्तांच्या (डीसीपी) बदली आणि नियुक्तीचे आदेश जारी केले होते. या आदेशांवर मंत्री अनिल देशमुख आणि अनिल परब खूश नव्हते आणि त्यांनी आदेश माघारी घेतला होता.

    तीन ते चार दिवसांनंतर मला कळले की पैसे आणि इतर काही तडजोडींनंतर हा आदेश जारी करण्यात आला होता. या पोलीस अधिकाऱ्यांकडून एकूण ४० कोटी रुपये घेण्यात आले होते. त्यापैकी २० कोटी रुपये संजीव पलांडे यांच्यामार्फत अनिल देशमुख यांना तसेच २० कोटी आरटीओ अधिकारी बजरंग करमाटे यांच्यामार्फत अनिल परब यांना देण्यात आले होते.

    अनिल देशमुख सचिन वाझेला त्यांच्या कार्यालय, घरी, राज्य अतिथीगृहात बोलावून विविध प्रकरणांच्या संदर्भात थेट निर्देश किंवा सूचना देत असत. सोशल मीडिया बनावट फॉलोअर केस सारख्या काही प्रकरणांमध्ये तर अनिल देशमुख स्वतःच निर्देश द्यायचे, असंही वाझेनी सांगितलं.

    अनिल देशमुख यांनी प्रत्येक बारमालकाकडून ३ लाख रुपये गोळा करण्याचे आदेश देत १७५० बार आणि रेस्टॉरंटची यादी देण्यात आली होती, असंही वाझेने सांगितलं. वाझेने डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान ४.७ कोटी रुपये गोळा केले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात अनिल देशमुख यांनी मला त्यांच्याकडून फोन केला आणि मला आजपर्यंत गोळा केलेली रक्कम कुंदन शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्याच्या सूचना दिल्या.