मोठी बातमी – विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळला सचिन वाझेचा जामीन अर्ज

सचिन वाझेचा जामीन अर्ज (Sachin Waze Bail Plea Rejected)  शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयाच्या  (Mumbai Session Court) विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळून लावला.

    मुंबई : अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्येसह खंडणीप्रकरणी (Mansukh Hiren Case)  अटकेत असलेला बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझेचा जामीन अर्ज (Sachin Waze Bail Plea Rejected)  शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयाच्या  (Mumbai Session Court) विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळून लावला.

    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील मानेंला एनआयएकडून प्रथम अटक करण्यात आली होती. त्यानंतर मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वाझेची चौकशी सुरू केली. मनी लॉन्ड्रींग प्रकरणात वाझेला जामीन देण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज वाझेकडून विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल करण्यात आला होता.

    सदर प्रकरणात ईडीकडून तपास पूर्ण झाला असून आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात आपल्याला अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे आपल्याला जामीन देण्यात यावा, अशी मागणी वाझेच्यावतीने याचिकेत करण्यात आली होती. त्या अर्जावर न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

    ईडीच्यावतीने वाझेच्या अर्जाला तीव्र विरोध करण्यात आला. माजी गृहमंत्री देशमुखांचा कथित प्रकरणात वाझेचाही तेवढाच सहभाग होता. तो संपूर्ण कटाचा मुख्य सुत्रधार आहे. जामीन मिळाल्यास तो फरार होण्याची शक्यता आहे. वाझे प्रभावशाली व्यक्ती असून जामीनावर सोडल्यास आपल्या आर्थिक सामर्थ्यावर तो तपासाची दिशा बदलून टाकून तो साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो. असा दावाही ईडीच्यावतीने वकील सुनील गोन्साल्विस यांनी केला. तसेच देशमुखांच्या निर्देशानुसारच वाझेने विविध बार मालकांसोबत बैठक घेत असे आणि त्यांचा बार सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दरमहा ३ लाख रुपये देण्यासही सांगितल्याचा दावा गोन्साल्विस यांनी केला. न्यायालयाने ईडीची बाजू ग्राह्य धरत वाझेचा जामीन अर्ज फेटाळून लावत त्याला दिलासा देण्यास नकार दिला.