मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, सदाभाऊ खोत यांचा राष्ट्रवादीवर घणाघात

'कुत्र्याला दगड मारला तर तो दगडाचा चावा घेतो. मात्र वाघाला दगड मारला तर तो नरडीचा खोट घेतो, असे म्हणत सदाभाऊचा प्राण गेला तरी चालेल. मात्र तुमचा मस्तवाल वाडा पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

    सोलापूर : उधारीच्या पैशावरून भाजप नेते सदाभाऊ खोत आणि हॅाटेलमालकाचा किस्सा आता चांगलाच चर्चेत आहे. पैसे न दिल्यानं हॅाटेलमालक अशोक शिंगारे सदाभाऊ खोत यांना अडवलं होतं. या प्रकरणी हॉटेल मालक अशोक शिंगारे यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर, तर टोमॅटोसारखे गाल असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्याला सांगू इच्छितो, की मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, असा घणाघात खोतांनी राष्ट्रवादीवर केला.

    सदाभाऊ खोत पंचायत राजच्या कामासाठी सांगोल्याच्या दौऱ्यावर असताना हॉटेल मालक अशोक शिंगारे यांनी सदाभाऊ खोत यांना अडवलं. तसेच थकीत बिलासंदर्भात जाब विचारण्यास सुरुवात केली. २०१४ पासून बिल थकवल्याचा आरोप हॅाटेल मालकाने केलाय. या सर्व प्रकारावर सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. ते म्हणाले, “२०१४ च्या निवडणुकीत माझा प्रचार करणारे कार्यकर्ते, पक्षाचे लोक घरातील भाकरी बांधून प्रचार करत होते. माझा एकही कार्यकर्ता त्या काळात हॉटेलमध्ये चहा देखील घेत नव्हता. कारण आमच्याकडे पैसेही नव्हते. २०१४ नंतर मी २०-२५ वेळा सांगोल्याचा दौरा केला. ही व्यक्ती कधीही मला येऊन भेटली नाही आणि काही सांगितलं नाही. कोण जेवलं, कुणी पाठवलं, त्याबाबत काही माहिती आहे का तेही मला आढळून आलं नाही.”

    ‘कुत्र्याला दगड मारला तर तो दगडाचा चावा घेतो. मात्र वाघाला दगड मारला तर तो नरडीचा खोट घेतो, असे म्हणत सदाभाऊचा प्राण गेला तरी चालेल. मात्र तुमचा मस्तवाल वाडा पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादीला दिला आहे. तर, राष्ट्रवादीकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

    काय आहे प्रकरण

    सदाभाऊ खोत गुरुवारी पंचायतराज समितीच्या दौऱ्याच्या निमित्ताने सांगोला पंचायत समितीमध्ये आले होते. यावेळी अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने आज दुपारी पंचायत समितीच्या आवारात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना अडवलं होतं. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समोरच उधारीसाठी हॉटेल मालकाने सदाभाऊ खोत यांच्याबरोबर हुज्जत घातली. सर्वांसमोर उधारीसाठी सदाभाऊ खोत यांना अडवल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.