राजू शेट्टी विरोधात सदाभाऊ खोत यांचा कलगीतुरा! मैत्रीचे झाले राजकीय शत्रुत रूपांतर; एकमेकांना खुल्या मैदानाची आव्हान

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू असताना माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात सुरू असलेले वाकयुद्ध आंदोलन संपल्यानंतरही संपलेले नाही. उलट दोघांनी एकमेकांना आव्हान देण्याची भाषा सुरूच ठेवली आहे. विशेष म्हणजे एकेकाळी हे दोघेही एकमेकांचे मित्र होते. त्यांच्यातील मैत्री केवळ सत्ताकारणातून संपुष्टात आली. सध्या या दोघांच्यात राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगू लागला आहे.

  दीपक घाटगे, कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू असताना माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात सुरू असलेले वाकयुद्ध आंदोलन संपल्यानंतरही संपलेले नाही. उलट दोघांनी एकमेकांना आव्हान देण्याची भाषा सुरूच ठेवली आहे. विशेष म्हणजे एकेकाळी हे दोघेही एकमेकांचे मित्र होते. त्यांच्यातील मैत्री केवळ सत्ताकारणातून संपुष्टात आली. सध्या या दोघांच्यात राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगू लागला आहे.

  २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेने पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांनी सत्तेत भागीदारी मागितली होती. म्हणून मग स्वाभिमानी संघटनेचे सदाभाऊ खोत यांना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यमंत्री म्हणून आपल्या मंत्रिमंडळात सामील करून घेतले. त्यानंतर राजू शेट्टी आणि युतीच्या सरकारमध्ये तात्विक मतभेद झाले आणि त्यांनी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी सदाभाऊ खोत यांनीही मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा असा आदेश स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत देण्यात आला होता. तथापि मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर राजू शेट्टी यांनी त्यांना संघटनेतून बडतर्फ केले. तेव्हापासून या दोघांमध्ये वितूष्ट  वाढत गेले आहे. दोन वर्षांपूर्वी दोघांनीही एकमेकांचे वाभाडे काढले होते. त्यांच्यातील वाद अगदी खालच्या पातळीपर्यंत पोहोचलेला होता. टीका करण्याची एकही संधी दोघानीही सोडली नाही. स्वाभिमानीतून बडतर्फ केल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेची स्थापना केली. शेट्टी आणि खोत यांचे आपापल्या संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विषयी असणारे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

  लोकसभेच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून राजू शेट्टी यांनी सुमारे दोन महिन्यापूर्वी साखर कारखानदारांच्या विरुद्ध ऊस उत्पादकांचे एक मोठे आंदोलन उभे केले होते. तेव्हापासून सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यात चांगलाच कलगी तुरा रंगला आहे . ऊस उत्पादकांचे आंदोलन समाप्त झाल्यानंतरही या दोघांमधील वाद संपण्याची चिन्हे अध्यापही दिसत नाहीत. राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या सहा जागा लढवणार  असल्याची घोषणा केली आहे. हातकणंगले मतदारसंघातून स्वतः राजू शेट्टी हे निवडणूक लढवणार आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि वाळवा हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. या दोन्ही मतदारसंघात सदाभाऊ खोत यांचा थोड्याफार प्रमाणात प्रभाव आहे. कदाचित रयत क्रांती संघटनेच्या वतीने सदाभाऊ खोत हे सुद्धा निवडणूक रिंगणात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.मुळातच शेतकरी संघटना ही शरद जोशी यांनी स्थापन केली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र आणले. तेव्हा राजू शेट्टी हे शरद जोशी यांच्या जवळचे सहकारी होते.

  तात्विक मतभेदानंतर संघटनेतून बाहेर
  शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेचे रूपांतर स्वतंत्र भारत पक्षात केल्यानंतर राजू शेट्टी आणि त्यांचे तात्विक मतभेद झाले. आणि ते संघटनेतून बाहेर पडले आणि त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन केली. त्यांच्या संघटनेला शह देण्यासाठी रघुनाथ पाटील (दादा) यांनी एक वेगळी चूल मांडली. सदाभाऊ खोत यांनी ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रूपांतर राजकीय पक्षात झाल्यानंतर त्याचे स्वागत केले होते. याच स्वाभिमानी संघटनेने २०१४ मध्ये भाजप आणि शिवसेनेच्या युतीला पाठिंबा दिला होता. या युतीमध्ये पाच राजकीय पक्ष असल्यामुळे त्यांना पांडवांची उपमा दिली जात होती.

   मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास दर्शविला नकार
  सदाभाऊंना मंत्रिपद मिळाल्यानंतर राजू शेट्टी यांना केंद्रात मंत्रिपद हवे होते आणि महाराष्ट्रात सत्तेत भागीदारी हवी होती. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या स्वाभिमानीला एक राज्यमंत्रीपद दिले. पण केंद्रात त्यांना संधी मिळाली नाही, म्हणून राजू शेट्टी यांनी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा आदेशही देण्यात आला होता. पण त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. त्यानंतर एकेकाळचे हे मित्र आज राजकीय शत्रू म्हणून एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत.