सदभाऊंचा आरटीओत ठिय्या, शेतकऱ्यावरील कारवाई मागे; कार्यालयाबाहेर हळद लिलावाचा इशारा

आरटीओ अधिकाऱ्याने वाहन पेठनाका येथे अडवून किरकोळ कारणावरून शेतकऱ्याला ३० हजार रुपयांचा दंड केला. ही माहिती मिळताच खोत यांनी सावळीतील आरटीओ कार्यालयासमोर हळदीची पोती ओतून लिलाव करण्याचा प्रयत्न केला.

    सांगली : माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आरटीओ कार्यालयात पुन्हा जुन्या पद्धतीने जोरदार धुमधडका केला, त्यामुळे अधिकारी नरमले. त्याचे असे झाले, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी सांगली बाजारपेठेत हळद विक्रीसाठी घेऊन येत असताना आरटीओ अधिकाऱ्याने वाहन पेठनाका येथे अडवून किरकोळ कारणावरून शेतकऱ्याला ३० हजार रुपयांचा दंड केला. ही माहिती मिळताच खोत यांनी सावळीतील आरटीओ कार्यालयासमोर हळदीची पोती ओतून लिलाव करण्याचा प्रयत्न केला.

    शिवाजी यादवराव वने (रा. आरडगाव, अहमदनगर) हा हळद उत्पादक शेतकरी पेठनाका मार्गे हळद विक्रीसाठी सांगली मार्केट यार्डात टेम्पोतून (एम. एच. १२ जी.टी. ९४२२) येत होता. पेठनाका येथे तपासणीसाठी उभे असलेल्या एका आरटीओ महिला अधिकाऱ्याने टेम्पो थांबवला. वाहनातून शेतकऱ्याला खाली उतरविले. चालकाचा मोबाईल अधिकाऱ्यांनी काढून घेतला. दंड न भरल्याने वाहन सावळी येथील आरटीओ कार्यालयात आणले.

    उरलेली रक्कम परत करा

    खोत यांनी आरटीओ कार्यालयासमोर हळदीची पोती रिकामी करुन लिलाव करण्याचा प्रयत्न केला. या पैशातून दंड भरून घेऊन अधिकाऱ्यांनी उरलेली रक्कम शेतकऱ्यांला परत द्यावी, अशी आक्रमक भूमिका घेतली.

    शेतकऱ्याचा दंड माफ

    राज्यातील शेतकऱ्यांनी जगावे की मरावे ? असा सवाल करीत खाेत यांनी मुजोरआरटीओ अधिकाऱ्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली. संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनाचा धसका घेऊन अधिकाऱ्यांनी त्वरित संबंधित शेतकऱ्याचा दंड माफ केला.

    पैशाचे तोरण बांधू

    यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला टार्गेट दिले आहे. यावर खोत म्हणाले, शेतकऱ्यांकडून भीक मागून, वर्गणी गोळा करून सरकारला सादर केली जाईल. आज अधिकाऱ्यांनी नमती भूमिका घेतली आहे. येथून पुढे अधिकाऱ्यांनी राज्यातील कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक केल्यास रयत क्रांती संघटनेच्या वतीने राज्यातून भीक मागून आर.टी.ओ. कार्यालयाला पैशाचे तोरण बांधू, असे सांगितले.