अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका, चाकण पोलिसांची कारवाई; सीसीटीव्हीद्वारे केला अपहरणाचा उलगडा

चाकण शहरातून १७ दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या एका सहा वर्षीय मुलाची चाकण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कार्ला (ता. मावळ) येथून आरोपीच्या ताब्यातून सुखरूप सुटका केली. एका भंगार गोळा करणाऱ्याने त्याला पळवून नेले होते.

चाकण : चाकण शहरातून १७ दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या एका सहा वर्षीय मुलाची चाकण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कार्ला (ता. मावळ) येथून आरोपीच्या ताब्यातून सुखरूप सुटका केली. एका भंगार गोळा करणाऱ्याने त्याला पळवून नेले होते. या प्रकरणी आरोपी सुरेश उर्फ सुरया लक्ष्मण वाघमारे (वय ४५) याला ताब्यात घेतले आहे. पारख उमेश सुर्यवंशी असे या सुटका झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याला त्याच्या आई वडीलांच्या ताब्यात देण्यात आले.

या मुलाला आरोपीने चाकण येथील घरासमोरून पळवून नेले होते. या बाबत त्याचे वडील उमेश सुर्यवंशी यांनी चाकण पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रसन्न जराड व त्यांच्या पथकातील सहायक फौजदार पप्पू हिंगे व इतर कर्मचार्यांनी आरोपी शोधण्यासाठी सर्वच ठिकाणी शोध मोहीम राबवली. परंतु, आरोपीकडे मोबाईल नसल्याने तांत्रिक माहिती उपलब्ध होत नव्हती फक्त सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून सुतावरुन स्वर्ग गाठण्याचा प्रयत्नांना अखेर यश आले.

सीसीटीव्हीतून अपहरणाचा उलगडा

तपास पथकाने घटनासथळ परिसरातील किमान १०० सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून शोध घेतला असता असे लक्षात आले की सुरेश वाघमारे या फिरस्त्यानेच अपहरण त्याचे केले आहे. आरोपीचे आणि अपहरण झालेल्या मुलाचे छायाचित्रे प्रसिद्ध केल्यामुळे आरोपी हा कार्ला परिसरात असल्याचे माहिती मिळाली आणि तपास पथक तातडीने तेथे जाऊन मुलाची सुटका करून आरोपीला ताब्यात घेतले.