मुसळधार पावसामुळे सहस्त्रकुंड प्रवाहित, पर्यटकांची होतेय गर्दी!

सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने धबधब्याने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले नाही. मात्र संथपणे वाहणारे पाणी पाहण्यासाठी इथे आतापासूनच गर्दी होतेय.

    नांदेड : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे.
    नांदेड जिल्हातही वरुण राजाची कृपादृष्टी झाली आहे. जिह्यातील सहस्त्रकुंड इथला धबधबा चांगलाच प्रवाहित झालाय. त्यामुळे धबधब्याचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी इथे तरुणाईने गर्दी केलीय.

    पैनगंगा नदीवर असलेला हा धबधबा कालपासून सुरू असलेल्या पावसाने चांगलाच प्रवाहित झालाय. आज सकाळपासून पावसाचा जोरही वाढल्याने आज सकाळपासूनच पर्यटकांनी मोठी गर्दी केलीयं. पाण्याचे उडणारे निसर्गनिर्मित तुषार मनमोहक ठरतायंत. पुढील काही दिवसांमध्ये पर्यटकांची (Tourists) गर्दी अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जातंय.

    धबधब्याचे नयनरम्य दृश्य

    दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यातच प्रवाहित होणारा धबधबा यंदा मात्र मॉन्सून लांबल्याने आता प्रवाहित झालाय. सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने धबधब्याने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले नाही. मात्र संथपणे वाहणारे पाणी पाहण्यासाठी इथे आतापासूनच गर्दी होतेय. धबधब्याचे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी प्रशासनाने उंच मनोरे तयार केले आहेत. या मनोऱ्यावर जाऊन निवांतपणे धबधबा पाहता येतोय, त्यातून पर्यटक आता मोठ्या प्रमाणात फोटोग्राफी करण्याचा आनंद देखील घेऊ शकता.