सकल मराठा समाज माढा लोकसभा लढणार, माळशिरसमधील बैठकीत निर्णय; लवकरच उमेदवार जाहीर करणार

माढा लोकसभेची निवडणूक सकल मराठा समाजाच्या वतीने उमदेवार जाहीर करून लढविण्यात येणार असल्याचा निर्णय माळशिरस येथे झालेल्या समाजाच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला असून, लवकरच उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे.

  अकलुज : माढा लोकसभेची निवडणूक सकल मराठा समाजाच्या वतीने उमदेवार जाहीर करून लढविण्यात येणार असल्याचा निर्णय माळशिरस येथे झालेल्या समाजाच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला असून, लवकरच उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा बांधवांची माळशिरस येथे नुकतीच बैठक झाली.

  दरम्यान मराठा आरक्षणाला टाळाटाळ करणाऱ्या सरकारला समाजाची ताकद दाखविण्याच्या दृष्टीने मतदार संघातील उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. यावेळी ७० हून अधिक जणांनी प्राथमिक माहिती भरून अर्ज सादर केले. या अर्जावर जरांगे पाटील व तालुक्यातील समन्वयकांच्या मदतीने एक उमेदवार निश्चित करून निवडणूक लढवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

  सकल समाजाच्या बैठकीत इतर समाज बांधवांनी ही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. धनगर, मुस्लिम बांधवांसह अन्य समाजातील उपस्थित मान्यवरांनी या भूमिकेला आपला पाठिंबा जाहीर केला. समाजाच्या आरक्षणाविषयी सरकारने केलेल्या फसवणुकीची सरकारला किंमत मोजावी लागणार असून मराठा बांधवांनी मतदार संघात एक उमेदवार देऊन जोरदार टक्कर देण्याचे नियोजन करण्यात आले.

  यावेळी मतदार संघातील विविध तालुक्यातील प्रत्येक गावचे प्रतिनिधी उपस्थित होते. उमेदवारांची प्राथमिक माहिती भरलेल्या सत्तरहून अधिक अर्जांवर चर्चा होऊन उमेदवार निश्चिती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

  हनुमंत रणनवरे यांना श्रद्धांजली अर्पण

  अंतरवाली सराटी येथून परतत असताना मांडकी (ता. माळशिरस) येथील हनुमंत रणनवरे यांचा अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेला सुरुवात झाली. लवकरच मनोज जरांगे पाटील या कुटुंबाला भेट देणार आहेत.