
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांचे ट्विट चांगलेच लक्षवेधी ठरत आहे. आपल्या ट्विटमधून संभाजी राजे यांनी शिवसेना तथा पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांना डिवचले आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेवर छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून दावा सांगितला होता, मात्र शिवसेना आणि संजय राऊत यांनी त्यांना पाठिंबा देण्याचे नाकारून पक्षाचा उमेदवार उभा केला. संजय राऊत यांनी आमची ४२ मते आम्ही अपक्ष उमेदवाराला का देऊ? असा थेट सवाल केला. तसेच, पाठिंबा हवा असेल तर पक्षात प्रवेश करा, अशी अट संभाजीराजे यांच्यावर घातली होती. परंतु, संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास स्पष्ट नकार दिला होता. आजच्या निकालानंतर संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रिया ट्विटरव्दारे नोंदवली आहे.
वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll
तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 11, 2022
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग संभाजीराजे यांनी ट्विट करत आपल्या भावना मांडलेल्या आहेत,
वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ।।
तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ।।
म्हणजेच, वाघाचे पांघरूण घेतल्यावर वाघासारखे दिसते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते. संत तुकारामांच्या अभंगाचा दाखला देत संभाजीराजे यांनी शिवसेनेला डिवचले आहे.