संभाजीराजे छत्रपती सरकारवर वैतागले ; वाचला अडचणींचा पाढा

किल्ले रायगडाच्या जतन संवर्धनाच्या कामाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याने संभाजीराजे छत्रपती सरकारवर वैतागले आहेत. रायगड प्राधिकरणाला निधी मिळत नाही, मनुष्यबळ मिळत नसल्याचे सांगत त्यांनी अडचणींचा पाढाच वाचला. संभाजीराजे छत्रपती किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत.

    पुणे : किल्ले रायगडाच्या जतन संवर्धनाच्या कामाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याने संभाजीराजे छत्रपती सरकारवर वैतागले आहेत. रायगड प्राधिकरणाला निधी मिळत नाही, मनुष्यबळ मिळत नसल्याचे सांगत त्यांनी अडचणींचा पाढाच वाचला. संभाजीराजे छत्रपती किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. रायगड विकासाच्या कामात तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्राधिकरण आणि पुण्यातील सी-डॅक संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. त्यानंतर संभाजीराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

    संभाजीराजे म्हणाले, की रायगड विकास प्राधिकरणाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. प्राधिकरणाच्या शासन निर्णयात अनेक त्रुटी आहेत. शासन निर्णयात बदल करून अडचणी दूर करण्याची मागणी सरकारकडे अनेकवेळा केली आहे. निम्मा वेळ फायली हलवण्यात जातो. प्राधिकरणाकडे कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता नाहीत, मनुष्यबळ नाही. सरकारकडून निधी जाहीर केला जातो, पण निधी मिळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक वर्ष सोहळ्यासाठी शंभर कोटींच्या निधीची मागणी केली आहे. मात्र तो अद्याप देण्यात आलेला नाही. रायगडाच्या विकास कामांवर आतापर्यंत ७५ कोटींचा खर्च झाला असून, केवळ तीन कोटी रुपयेच प्राधिकरणाकडे आहे.