कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी संभाजी शिंदे तर उपसभापतीपदी नामदेव शेलार यांची बिनविरोध निवड

    वडगाव मावळ : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी संभाजी अनंत शिंदे तर उपसभापतीपदी नामदेव नानाभाऊ शेलार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

    सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मावळ कार्यालयात बुधवारी (दि.२४) सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी घुले यांच्या उपस्थितीत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उप सभापती पदाची निवडणूक घेण्यात आली.

    सभापती पदासाठी एकमेव संभाजी शिंदे यांचे नामनिर्देशन पत्र तर उप सभापती पदासाठी एकमेव नामदेव शेलार यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. नामनिर्देशन पत्र छाननी व माघार झाल्यावर एकमेव उमेदवार असल्याने सभापतीपदी संभाजी शिंदे व उपसभापती पदी नामदेव शेलार यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

    याप्रसंगी संचालक सुभाषराव जाधव, दिलीप ढोरे, मारुती वाळुंज,शिवाजी असवले,बंडू घोजगे, विलास मालपोटे, विलास मानकर,अमोल मोकाशी, नथु वाघमारे, विक्रम कलावडे,साहेबराव टकले, साईनाथ मांडेकर, सुप्रिया मालपोटे, अंजली जांभुळकर, शंकर वाजे, नामदेव कोंडे आदी उपस्थित होते.

    निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, जिल्हा परिषद माजी सभापती बाबुराव वायकर,दीपक हुलावळे,ॲड नामदेव दाभाडे आदीनी विशेष प्रयत्न केले. तसेच माजी नगरसेवक संतोष भेगडे,कैलास गायकवाड,योगेश गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

    संभाजी शिंदे हे शिळींब ग्रामपंचायतीचे चारवेळा सरपंच व शिळींब विकास सोसायटीचे दहा वर्षे चेअरमन तर नामदेव शेलार हे डाहुली ग्रामपंचायतीचे तीनदा आदर्श सरपंच असून विद्यमान सरपंच आहेत. खांड विकास सोसायटीचे १९९० पासून संचालक आहेत. अनुभवी सभापती व उप सभापती असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती संभाजी शिंदे तर उप सभापती नामदेव शेलार यांच्या निवडीबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी संभाजी शिंदे म्हणाले, “आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय, तसेच मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा कृषी माल खरेदी विक्री करण्यासाठी बाजार सुरू केला जाईल.”