Samriddhi Jeevan Foods Scam Accused Caught
Samriddhi Jeevan Foods Scam Accused Caught

  पुणे : महाराष्ट्रासह देशभरातील ६४ लाख गुंतवणूकदारांच्या फसवणूक करणाऱ्या समृद्धी जीवन फुड्स घोटाळ्यातील फरार आरोपीला गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली. गेल्या सात वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. प्रमुख आरोपींपैकी तो एक असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  गुन्ह्याचा तपास सीआयडीकडून सुरू

  रामलिंग हिंगे (वय ५६, रा. गोकुळनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडून सुरू आहे. ही कारवाई सीआयडीतील अप्पर पोलीस अधीक्षक तृप्ती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलीस हवालदार सुनिल बनसोडे, प्रदीप चव्हाण, कोळी यांच्या पथकाने केली आहे.

  ४ हजार ७२५ कोटींहून अधिक रकमेचा अपहार

  समृद्धी जीवनचे सर्वेसर्वा महेश मोतेवार याने समृद्धी जीवन फुड्स इंडिया लिमिटेड व समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टी पर्पज को. ऑप सोसायटी स्थापन केली होती. त्यांनी महाराष्ट्रासह देशभरात शाखा सुरू केल्या. तसेच, त्या माध्यमातून गुंतवणूक करून घेतली. यामध्ये जवळपास ४ हजार ७२५ कोटींहून अधिक रकमेचा अपहार केला होता. समृद्धी जीवन फुड्स इंडिया लिमिटेड व समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टी पर्पज को. ऑप सोसायटीच्या देशभरात विस्तार होता.

  १६ जणांना आतापर्यंत अटक

  एक गुन्हा दाखल झाल्यानंतर देशात जवळपास २६ गुन्हे दाखल झाले होते. देशातील ६४ लाख गुंतवणूकदारांची त्यांनी फसवणूक केली होती. त्यात महाराष्ट्रातील तब्बल १८ लाख गुंतवणूकदारांचा समावेश आहे. या गुन्ह्यात सीआयडीने २५ आरोपी निष्पन्न केले असून, त्यातील १६ जणांना आतापर्यंत अटक केली आहे. त्यांच्यावर दोषारोपपत्र देखील दाखल केले आहे.

  सात वर्षांपासून फरार होता आरोपी

  दरम्यान, महेश मोतेवार व रामलिंग हिंगे यांनी संगणमत करून ही फसवणूक केल्याप्रकरणी २०१६ मध्ये गुन्हा नोंद झाला. यानंतर हिंगे हा गेल्या सात वर्षांपासून फरार झाला होता. तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. दरम्यान, तो सातारा रोडवरील सिटी प्राईडजवळ येणार असल्याची माहिती सीआयडीला मिळाली. त्यानूसार, पथकाने त्याला पकडले. त्याला अटककरून पुढील तपास सुरू केला आहे.