पंढरपूरमध्ये गाढवांवरुन वाळू तस्करी, प्रशासन हतबल; अधिकाऱ्यांकडून कारवाई होणार का?

वाळूमाफियांनी राज्यातील नद्यांची अक्षरश: चाळणी केली आहे. वाळू चोरण्याच्या ना ना क्लुप्त्या वाळूमाफियांनी आजपर्यंत वापरल्या आहेत. मात्र आता वाळूमाफियांनी नामी शक्कल लढवत वाळू तस्करीसाठी गाढवांचा वापर सुरु केला आहे.

  पंढरपूर : वाळूमाफियांनी राज्यातील नद्यांची अक्षरश: चाळणी केली आहे. वाळू चोरण्याच्या ना ना क्लुप्त्या वाळूमाफियांनी आजपर्यंत वापरल्या आहेत. मात्र आता वाळूमाफियांनी नामी शक्कल लढवत वाळू तस्करीसाठी गाढवांचा वापर सुरु केला आहे. यामुळे प्रत्यक्ष कारवाई करताना महसूल प्रशासन चक्रावून गेले आहे.

  वाळू माफियांनी बोटी, जेसीबी, ट्रॅक्टर आदी वाहनांवर कारवाईचे प्रमाण वाढल्यानंतर प्रशासनाच्या भीतीने गाढवांद्वारे वाळू तस्करीचा नवा फंडा अमलात आणला आहे. चंद्रभागा आणि मानगंगा या दोन महत्वाच्या नद्यांनी पंढरपूर तालुका समृद्ध बनवला. मात्र आज वाळूच्या वाढत्या तस्करीने या नद्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. उच्च न्यायालयाने कडक निर्बंध घातल्याने वाळू ठेक्यांचे लिलाव अद्याप झाले नाहीत. याचाच फायदा घेत नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा करुन वाहतूक केली जात आहे.

  वाळूच्या वाहतुकीसाठी टिपर, ट्रॅक्टर, जेसीबी या वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. परंतु महसूलचे पथक या वाहनांवर कारवाई करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर वाळू माफियांनी नामी शक्कल लढवत वाळूच्या वाहतुकीसाठी गाढवांचा वापर वाढविला. चंद्रभागा नदीपात्रातून वाळू उपसायची आणि गाढवांच्या साहाय्याने नदीपासून दूर अंतरावर वाहून नेत त्याचे ढिगारे केले जायचे. तिथून वाहनांच्या साहाय्याने वाळू वाहतूक करून जास्त भावाने ती विक्री केली जायची. दिवसाढवळ्या आणि रात्री नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरुन नेली जात असून वाळू माफियांनी लढवलेल्या या नामी शकलीमुळे प्रशासनाचे अधिकारी हतबल झाल्याचे दिसून येत आहेत.

  वाळू उपसा कायमचा बंद करण्याची मागणी अनेक सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. परंतु याबाबत महसूल प्रशासन विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याबद्दल नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. मात्र उच्च न्यायालयाने हे देताना कडक निर्बंध घालून दिले आहेत. यामुळे अद्याप या ठेक्यांचा लिलाव झालेला नाही. त्यामुळे तालुक्यात वाळूची टंचाई आहे.

  कायमचा उपसा बंद करा

  सध्या केवळ शासकीय कामांसाठीच काही ठिकाणाहून वाळू उपसण्याचे आदेश आहेत. मात्र वाळू माफियांनी तालुकाभर अनेक ठेक्यांमधून अवैध वाळू उपसा सुरूच ठेवला आहे. ज्यावर प्रशासन कारवाई करत असलं तरीही ना ना प्रकारे वाळूचा उपसा सुरूच असल्याने नद्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. नदीकाठच्या गावातील पाणी पातळीवर याचा परिणाम झाला आहे. यामुळे वाळू उपसा कायमचा बंद करण्याची मागणी गावकरी करत आहेत.

  किती दिवस कोंडून ठेवणार?

  प्रशासन अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या पोलीस ठाणे, तहसीलमध्ये लावून ठेवतात. त्या मालकांवर गुन्हे दाखल करुन दंड वसूल करुन गाड्या सोडल्या जातात. मात्र आता ही गाढवं पकडून त्यांना किती दिवस कोंडून ठेवणार? हा एक मोठा प्रश्न आहे. गाढवांना खाऊ-पिऊ घालायचे काम देखील प्रशासनाला करावे लागणार आहे.