Maratha reservation case
Maratha reservation case

Sandeep Kshirsagar : पहिल्यांदाच्या बीडच्या जाळपोळीच्या घटनेवर संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी बीड पोलिसांवर (Beed Police) काही गंभीर आरोप केले आहे. वाचा यावरील सविस्तर रिपोर्ट

    बीड : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे आंतरवाली सराटीत उपोषण सुरू असतानाच, 30 व 31 ऑक्टोबर रोजी बीडमधील (Beed) आंदोलक आक्रमक झाले होते. ज्यात मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या होत्या. विशेष म्हणजे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्या राहत्या घरात आणि राष्ट्रवादी भवनातदेखील आग लावण्यात आली होती. या घटनेनंतर राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले होते. मात्र, या सर्व घटनेवर माध्यमांना प्रतिक्रिया देण्याचं संदीप क्षीरसागर यांनी टाळले होते. परंतु, आज पहिल्यांदाच्या बीडच्या जाळपोळीच्या घटनेवर त्यांची प्रतिक्रीया आली आहे. यावेळी बोलतांना संदीप क्षीरसागर यांनी बीड पोलिसांवर (Beed Police) काही गंभीर आरोप केले आहे.

    बीड जिल्ह्यात झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनेमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराच देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर, त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये उभा असलेल्या आठ गाड्या जमावाने पेटवून दिल्या होत्या. त्यानंतर, संदीप क्षीरसागर यांनी पहिल्यांदाच माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. “ज्या लोकांनी जाळपोळ आणि दगडफेक केली ते मराठा आंदोलक नव्हते. जे काही समाजकंटक होते, त्यांचा सूत्रधार पोलिसांनी शोधून काढला पाहिजे. बीडमध्ये घडलेल्या घटनेचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे आहे. मात्र, तरी देखील पोलीस मुख्य सूत्रधारावर का कारवाई करत नाहीत. तर, आगामी अधिवेशनामध्ये देखील यावर आवाज उठवणार असल्याचे आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले आहेत.

    जळालेल्या कार्यालयात यंदाची दिवाळी साजरी करणार…
    मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असतानाच बीडमध्ये दगडफेक आणि जाळपोळ झाली होती. यामध्ये शरद पवार गटाचे राष्ट्रवादी भवनात घुसून जमावाने मोठी तोडफोड केली होती. तसेच, राष्ट्रवादी भवनाच्या इमारतीला आग लावली. यामध्ये इमारतीमधील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. तर, सध्या या इमारतीमध्ये डागडुजीचे काम सुरू आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी याच इमारतीची पाहणी आमदार रोहित पवार यांनी केली होती. यावेळी, यंदाचा दिवाळी पाडवा याच राष्ट्रवादी भवनमध्ये आपल्या कुटुंबासह साजरा करणार असल्याची माहिती बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली होती. त्यामुळे जळालेल्या कार्यालयात यंदाची दिवाळी साजरी करण्याचा निर्णय रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर या दोन युवा आमदारांनी घेतला आहे. यावेळी सोबत या दोघांचे परिवारही असणार आहेत.