सांगली सामूहिक आत्महत्या प्रकरण : १३ जणांना अटक २५ जणांवर गुन्हा ; सावकारांच्या त्रासाला कंटाळून कृत्य

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे एकाच कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली. डॉक्टर माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे यांच्या कुटुंबाने सावकारांच्या त्रासास कंटाळून आत्महत्या केल्याचे समाेर आले.

  सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे एकाच कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली. डॉक्टर माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे यांच्या कुटुंबाने सावकारांच्या त्रासास कंटाळून आत्महत्या केल्याचे समाेर आले. या प्रकरणी २५ जणांवर गुन्हा दाखल झाला असून आजपर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीसांनी दिली.
  नरवाड रोड अंबिका नगर चौंडजे मळा आणि हॉटेल राजधानी कॉर्नर या दोन ठिकाणी एकाच कुटुंबातील नऊ जणांचे घरात मंगळवारी मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली हाेती. पशु वैद्यकीय डॉक्टर माणिक यल्लप्पा वनमोरे आणि त्यांचा शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे या दोघांच्या आई, पत्नी आणि मुलांचा मृतांत समावेश आहे. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार वनमोरे यांच्या कुटुंबाने आर्थिक कारणावरून विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे पाेलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

  – पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
  पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम म्हणाले डॉ. माणिक यल्लप्पा वनमोरे, पत्नी रेखा माणिक वनमोरे, आई आक्काताई यल्लप्पा वनमोरे, मुलगी प्रतिमा माणिक वनमोरे , मुलगा आदित्य माणिक वनमोरे, पुतण्या शुभम पोपट वनमोरे तसेच राजधानी हॉटेल जवळ दुसऱ्या घरात डॉ. माणिक यांचा भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे, संगीता पोपट वनमोरे, मुलगी अर्चना पोपट वनमोरे यांच्या मृत्यूप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  – दोघा भावांच्या खिशात सापडली चिठ्ठी
  यापैकी १३ जणांना अटक करण्यात आली आहे. दोघा भावाच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे. त्यात अनेकांची नावे आहेत. वनमाेरे कुटुंबाने सावकरांकडून कर्ज घेतले आहे. व्यापारासाठी हे कर्ज घेतले होते असे चिठ्ठीत नमूद आहे असेही गेडाम यांनी नमूद केले.