सांगली शिक्षक बँकेत दुरंगी लढत स्पष्ट ; २१ जागांसाठी ३ जुलै रोजी मतदान

प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिक्षक संघाच्या शि. द. पाटील गटातील सर्व १६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता शिक्षक समिती व शिक्षक संघाच्या थोरात गटात दुरंगी लढत होत आहे.

    सांगली : प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिक्षक संघाच्या शि. द. पाटील गटातील सर्व १६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता शिक्षक समिती व शिक्षक संघाच्या थोरात गटात दुरंगी लढत होत आहे.

    शिक्षक बँकेच्या २१ जागांसाठी ३ जुलै रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी १३६ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४४ अर्ज शिल्लक राहिले आहेत. सत्ताधारी शिक्षक समिती पुरस्कृत पुरोगामी सेवा मंडळ, शिक्षक संघ थोरात गट प्रणित स्वाभिमानी शिक्षक आघाडी, शि. द. पाटील गट अशा तीन गटाकडून अर्ज दाखल करण्यात आले होते. याशिवाय काही अपक्षांनी मैदानात नशीब आजमावित होते. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. दिवसभरात शि. द. पाटील गटाच्या १६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तर शिक्षक भारतीच्या दोन उमेदवारांनी सर्वसाधारण व राखीव गटातून अर्ज कायम ठेवले आहेत. त्यामुळे शिक्षक भारतीत बंडखोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

    त्यामुळे आता शिक्षक समिती व थोरात गटाच्या स्वाभिमानी आघाडीत लढत होणार आहे. दोन्ही गटांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच प्रचार, बैठकांचा जोरही वाढविला आहे. आरोपप्रत्यारोपांच्या फेऱ्याही झडू लागल्या आहेत. समितीने शिक्षक भारती, खासगी प्राथमिक शिक्षक महासंघांशी युती केली आहे. तर स्वाभिमानी आघाडीत जुनी पेन्शन हक्क संघटना, उर्दू संघटना, मागासवर्गीय संघटनेसह लहान-मोठ्या संघटनांनी एकत्र येत पॅनेल उभे केले आहे.