सांगलीचा तिढा सुटेना, मैत्रीपूर्ण लढतीचीच शक्यता; नेत्यांकडून काँग्रेस श्रेष्ठींवर दबाव

सांगलीसह राज्यातील पाच जागांच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत निर्माण झालेला तिढा सुटण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे या पाचही जागांवर मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता आहे. तशा हालचाली सुरू झाल्या आहेत.

  सांगली : सांगलीसह राज्यातील पाच जागांच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत निर्माण झालेला तिढा सुटण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे या पाचही जागांवर मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता आहे. तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. या पाच मतदारसंघांबाबत तडजोडीची भूमिका घेण्यापेक्षा मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव मान्य करावा, यासाठी स्थानिक नेत्यांकडून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर दबाव वाढला आहे.

  दरम्यान आज (रविवारी) या संदर्भात महविकास आघाडीची बैठक होणार आहे. ज्या जागांवर मतभेद आहेत, तेथील निर्णय प्रदेश काँग्रेसने त्या त्या ठिकाणी घ्यावा, असे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सांगितल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रातील अशा जागा लढविण्याची तयारीही काँग्रेसकडून सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

  सांगली, भिवंडीसह मुंबईतील तीन मतदारसंघांबाबत हा पेच निर्माण झाला आहे. तो सोडवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अनेकवेळा बैठका झाल्या आहेत. मात्र, कोणताही सर्वमान्य तोडगा समोर आलेला नाही. शुक्रवारी काँग्रेस नेत्यांची ऑनलाईन बैठक झाली. बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला यांच्यासह पक्षाचे राज्यातील अनेक नेते उपस्थित होते.

  वारंवार चर्चा करूनही तोडगा निघत नसेल, तर मैत्रीपूर्ण लढतीचाच पर्याय शिल्लक राहतो. त्यामुळे कोणतीही तडजोड करण्यापेक्षा मैत्रीपूर्ण लढतच योग्य ठरेल, अशी भूमिका अनेक नेत्यांनी बैठकीत मांडली. या मागणीबाबतचा अहवाल दिल्लीला पक्षश्रेष्ठींना पाठविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

  महाविकास आघाडीची तातडीची आज बैठक

  काँग्रेसच्या या पवित्र्यानंतर महाविकास आघाडीने रविवारी (दि. ३१) तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवसेनेचे उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे नेते शरद पवारही उपस्थित असणार आहेत. त्यात काँग्रेसच्या या भूमिकेवर नेमका काय निर्णय होणार, याची उत्सुकता आहे. या बैठकीत काँग्रेसच्या भूमिकेवर काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

  वंचितच्या पाठिंब्यासाठी हालचाली

  वंचित बहुजन पक्षाने राज्यात काही ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत. काही ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. सांगलीतही काँग्रेसला वंचितने पाठिंबा द्यावा, यासाठी हालचाली सुरू आहेत.

  समाजमाध्यमावर आरोप-प्रत्यारोप

  आघाडीच्या जागेवरून काही दिवसांपासून हा मुद्दा राज्यभर गाजत आहे. तो राष्ट्रीय पातळीवर गेला आहे. त्यातून जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसची ताकद किती आहे, यावरून दोन पक्षांतील समर्थकांत समाजमाध्यमांवर देखील जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.