सांगलीची कुस्ती तिरंगीच! विशाल पाटील निवडणूक लढण्याच्या तयारीत

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उमेदवारीच्या कुस्तीत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मैदान मारले आहे, मात्र यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी असून आता मशाल नाही फक्त विशाल म्हणत विशाल पाटील यांनी ही निवडणूक अपक्ष लढावी, अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.

  सांगली/प्रवीण शिंदे : सांगली लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा फैसला अखेर झाला. महविकास आघाडीच्या बैठकीत सांगली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मशालीला मिळणार असल्याचं जाहीर झालं. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उमेदवारीच्या कुस्तीत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मैदान मारले आहे, मात्र यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी असून आता मशाल नाही फक्त विशाल म्हणत विशाल पाटील यांनी ही निवडणूक अपक्ष लढावी, अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे विशाल पाटील अपक्ष लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत, तसे झाल्यास सांगलीच्या आखाड्यात तीन पैलवान भिडणार आहेत.

  सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. एकेकाळी वसंतदादांच्या घरातून राज्यातील तिकिटे वाटली जायची, त्याच घरावर आज तिकीट मिळवण्यासाठी वणवण करावी लागली, तरीही पदरी निराशाच आली. सांगली आणि राज्याच्या राजकारणात वसंतदादा पाटील घराण्याचे अस्तित्व राखण्यासाठी, स्वतःच्या दूरवरच्या राजकीय वाटचालीचे भवितव्य ठरविण्यासाठी विशाल यांनी लढले पाहिजे. ते लढले तर आणि तरच राजकीय पटावरील त्यांचेही महत्त्व राहील, ते वाढत जाईल. नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे विचार, भावना लक्षात घेऊन ते निर्णय घेतील, अशी अपेक्षा समाजमाध्यमात व्यक्त केली जात आहे.

  ते आखाड्यात उतरले तरच कुस्ती तुल्यबळ होईल. त्याचा फायदा पुढील राजकारणासाठी त्यांच्यासह काँग्रेस पक्षासाठी मोलाचा असेल. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी लढणे ही त्यांची, काँग्रेसची जमेची बाजू ठरेल, अशी मागणी कार्यकर्ते करू लागले आहेत. जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे पक्षाला पाठवले आहेत. विशाल पाटील यांच्या निर्णयात काँग्रेसचे जिल्ह्यातील नेतृत्व, माजी मंत्री, आमदार डॉ. विश्वजित कदम यांची भूमिका आता महत्वाची ठरणार आहे.

  संजय पाटलांनी मिळवली उमेदवारी

  सांगली लोकसभा मतदार संघात यंदा भाजपकडून उमेदवार बदलला जाणार अशी चर्चा होती, मात्र ऐनवेळी थेट दिल्लीतून संजय पाटील (काका) यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी मिळवत मैदान मारले. त्यांनी आता प्रचाराचा मध्य गाठला आहे. अशावेळी महविकास आघाडी मात्र जागावाटपात भांडत बसली आहे.

  विशाल करारीपणा दाखवणार का ?

  मदन पाटील यांनी प्रकाश पाटील यांना २००४ साली उमेदवारी मिळवण्यासाठी जंग जंग पछाडले, कॉंग्रेसभवन समोर घातलेला मंडप काढण्याची वेळ आणली. आणि त्यांनी प्रकाश पाटील यांना घरातून स्वतः प्रचार न करता निवडून आणले. राष्ट्रवादीत गेल्यावर मंत्रिपद मागितल्यावर त्यांना आधी निवडून या, म्हणून अपमानित करण्यात आले, त्यावेळी दरवाजा फोडून येऊ असे खुद्द शरद पवार यांना त्यांनी सांगितले होते. नंतर निवडून तर आलेच आणि मंत्रिपद सुद्धा मिळवले, हाच करारी बाणा विशाल पाटील यांनी दाखवावा, अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

  शेतकऱ्यांच्या मुलाने खासदार होऊ नये काय ?

  डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उमेदवारीचे मैदान मारले, मात्र राजकारणात नवखे, शिवसेनेचे नसलेले केडर, नाराज काँग्रेस अशी आव्हाने त्यांच्यासमोर आहेत. मात्र त्यांचे समर्थक शेतकऱ्यांच्या मुलाने खासदार होऊ नये काय ? असा सवाल समाजमाध्यमात विचारत आहेत. आता हे चक्रव्यूह चंद्रहार पाटील कसे भेदणार, राष्ट्रवादीची रसद पूर्ण मिळणार का ?, यावर पुढील राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहेत.