नीरा नदीच्या दूषित पाण्याने सांगवीकर त्रस्त ; कारखानदारांवर कारवाई करण्याची मागणी

सध्या दुष्काळी पार्श्वभूमीचा विचार करता नीरा नदीमधील बंधाऱ्यातील उपलब्ध पाणी दूषित होताना दिसून येत आहे. मासे मृत्यूमुखी पडत आहेत, हीच परिस्थिती कायम राहिल्यास उन्हाळ्यामध्ये सांगवी, निरावागज, शिरवली, खांडज , कांबळेश्वर आदी नदीकाठच्या गावांना प्रचंड पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे, या घटनेची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने संबंधित कारखानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी सांगवीकरानी केली आहे.

    पुणे : सध्या दुष्काळी पार्श्वभूमीचा विचार करता नीरा नदीमधील बंधाऱ्यातील उपलब्ध पाणी दूषित होताना दिसून येत आहे. मासे मृत्यूमुखी पडत आहेत, हीच परिस्थिती कायम राहिल्यास उन्हाळ्यामध्ये सांगवी, निरावागज, शिरवली, खांडज , कांबळेश्वर आदी नदीकाठच्या गावांना प्रचंड पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे, या घटनेची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने संबंधित कारखानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी सांगवीकरानी केली आहे.

    याबाबत बोलताना बारामती दूध संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश तावरे म्हणाले, “ यंदा दुष्काळी प्राप्त स्थिती विचारात घेऊन आम्ही पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याचे आणि उभ्या उसाच्या पिकाचे योग्य नियोजन केले आहे. परंतु नीरा नदीमध्ये फलटण तालुक्यातील कारखानदारांनी रसायन मिश्रित पाण्याचा लोंडा सांगवी शिरवली बंधाऱ्यात सोडला आहे. उपलब्ध पाण्याची दुर्गंधी सुटली आहे. माशांसह जलचर प्राणी मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.  हीच प्रतिकूल स्थिती कायम राहिल्यास नदीकाठची गाव पाण्या अभावी अडचणीत येऊ शकतात. उन्हाळ्यामध्ये जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, चाऱ्याचा प्रश्न कसा सोडवायचा या चिंतेत सर्व शेतकरी, गावकरी आहेत. प्रशासनाने या घटनेची योग्य दखल घेऊन फलटण तालुक्यातील कारखानदारावर कारवाई करावी, ही आमची मागणी आहे.”

    नीरा नदी प्रदूषित होऊ नये , यासाठी केंद्रस्तरावर सहा महिन्यापूर्वी प्रयत्न झाले होते, केंद्रीय मंत्री तसेच प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी प्रदूषित नदीची पाहणी केली होती. तसेच संबंधित आक्षेप असलेल्या कारखानदारांची माहिती संकलित केली होती व त्यासंबंधीचा अहवाल तयार केला होता. या अहवालाच्या आधारे कारवाई होईल, असे वाटले होते , परंतु तसे झाले नाही. परिणामी संबंधित कारखानदारांची नदीत सध्या रसायन मिश्रित पाणी सोडण्याची हिम्मत अधिकच वाढलेली दिसून येते,” असे मत शेतकरी राहुल तावरे यांनी स्पष्ट केले. यावेळी अरविंद तावरे , मोहन फरतडे, अण्णासाहेब सालगुडे , नरसिंग जगताप, अंकुश तावरे, महेश अण्णा तावरे आदी शेतकऱ्यांनी या समस्येबाबत आक्रमक भूमिका घेतली होती.

    बगळ्यांची वर्दळ वाढली…

    सांगवी, शिरवली बंधाऱ्यामध्ये मृत्युमुखी पडलेले मासे व जलचर प्राणी खाण्यासाठी बगळे व पानकोंबड्याची वर्दळ वाढली आहे. विशेष म्हणजे दूषित पाण्याच्या वासाने इतर पक्षी नदी परिसरात फिरकत नाहीत, हे विधायक चित्र कधी बदलणार याबाबत सांगवीकरांनी सवाल उपस्थित केला आहे.