
संजय राऊत म्हणाले की, “हीच शिंदे गटाची लायकी आहे. ज्या शिवसेनेने 2014 मध्ये एका जागेसाठी युती तोडली होती, ती स्वाभिमानासाठी तोडली होती. आता यांच्यासमोर 40-45 जागांचे तुकडे फेकले जात आहेत. यांच्यासमोर आयुष्यभर तुकडेच फेकले जातील आणि हेच तुकडे तोंडात ठेऊनच त्यांना जगावं लागेल, यांच्यात कोणताही स्वाभिमान नाही”.
मुंबई:आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा (BJP) 240 जागा लढवेल. शिंदे गटाच्या वाट्याला 48 जागा येतील अशा आशयाचं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर संजय राऊत (Sanjay Ruat) यांनी शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. मुंबईत (Mumbai) माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत म्हणाले की, “हीच शिंदे गटाची लायकी आहे. ज्या शिवसेनेने 2014 मध्ये एका जागेसाठी युती तोडली होती, ती स्वाभिमानासाठी तोडली होती. आता यांच्यासमोर 40-45 जागांचे तुकडे फेकले जात आहेत. यांच्यासमोर आयुष्यभर तुकडेच फेकले जातील आणि हेच तुकडे तोंडात ठेऊनच त्यांना जगावं लागेल, यांच्यात कोणताही स्वाभिमान नाही. राज्याचा भाजपाचा प्रदेशाध्यक्ष सांगतो, तुम्हाला 40 जागा देऊ, 25 जागा देऊ उद्या ते यांना पाच जागा सुद्धा देतील. हीच त्यांची लायकी आहे. त्यामुळेच भाजपाने शिवसेना तोडली. त्यांना या महाराष्ट्रात शिवसेनेचा दरारा संपवायचा होता.”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
ते पुढे म्हणाले, “मुळात मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र तरी माहिती आहे का? त्यांना शेतकऱ्यांचे आणि महाराष्ट्राचे प्रश्न तरी माहिती आहेत का? तर दुर्दैवाने याचं उत्तर नाही असं आहे. मुख्यमंत्र्यांना फक्त सुप्रीम कोर्टाच्या निकालाची काळजी आहे. निवडणूक आयोगाप्रमाणे हा निकाल सुद्धा विकत घेता येईल का? याचा ते विचार करत आहेत. पण आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्राला न्याय मिळेल”.
“सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या की नाही, हा वादाच विषय आहे. कारण शेतकऱ्यांच्या मोर्चा आजही सुरू आहे. दुर्देवाने एका शेतकऱ्याचा काल मृत्यू झाला. याला सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. सरकारने वेळीच पावले उचलली नाहीत. दोन फुसके मंत्री चर्चा करण्यासाठी नेमके होते. एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे, त्याचं प्रायश्चित तुम्ही केलं पाहिजे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
त्यांनी पुढे सांगितलं की, “या सरकारवर निसर्ग कोपला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे शेतपिकांचं नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, सरकारने कोर्टबाजीत गुंतलं आहे. विरोधकांना त्रास देण्यात सरकार व्यस्त आहे. शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती आवळल्या जाणाऱ्या फासाकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी राज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे”.