संजय राऊतांची नार्वेकरांवर जहरी टीका; ‘अपात्रतेचा निर्णय त्यांची बायकोही मान्य करणार नाही…’

महापत्रकार परिषदेवेळी खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

    मुंबई : आमदार अपात्रतेच्या (ShivSena MLA disqualification) सुनावणीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महापत्रकार परिषदेचे (Mahaptrakar Parishad) आयोजन केले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर  (Rahul Narwekar) यांनी दिलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीवरील निर्णयावर ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली. या निर्णयावर आक्षेप घेत त्यांची चिरफाड करण्यासाठी ठाकरे गटाने महापत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासह कायदेतज्ज्ञ देखील उपस्थित आहे. या महापत्रकार परिषदेवेळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

    संजय राऊत आमदार अपात्रतेच्या निर्णयावर म्हणाले, “आजचा दिवस हा इतिहासात नोंदवला जाईल. आज न्यायमूर्तीची भूमिका महाराष्ट्रातील जनता बजावत आहे. विधानसभा अध्यक्षांना लवाद म्हणा असे आदित्य ठाकरे मला सांगत असतात. या लवाद राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आणि या लवादाच्या अंत्ययात्रा जागोजागी निघाल्या. विधानसभा अध्यक्षांच्या अत्यंयात्रा निघाल्या असं महाराष्ट्रात कधी घडलं नव्हतं. या लवादानं बाळासाहेबांची शिवसेना कोणताही पुढचा-मागचा विचार न करता शिंदे गटाच्या हातात दिली त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र खदखदतोय.”

    पुढे संजय राऊत म्हणाले, “लवादचा अपात्रतेचा दिलेला निर्णय हा त्यांची बायकोही मान्य करणार नाही असा हा निकाल आहे. या राज्याचे मुख्यमंत्री दाढीला पिळ देऊन नेहमी सांगत असतात. कर नाही त्याला डर कशाला, बरोबरच आहे कर नाही डर नाही म्हणून आम्ही ही पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवली. आम्ही ईमानदारीने लढलो आणि तुम्ही बेईमानीने जिंकलात” अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली.