…तर संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार; तानाजी सावंत यांचा इशारा

आरोग्य विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दोन-तीन दिवसांत खात्याची माफी मागितली नाही, तर वकीलांच्या सल्यानुसार अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांनी दिला.

    नागपूर : आरोग्य विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दोन-तीन दिवसांत खात्याची माफी मागितली नाही, तर वकीलांच्या सल्यानुसार अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांनी दिला.

    पत्रकारांशी साधलेल्या संवादात डॉ. सावंत म्हणाले, गेली वर्षभर आरोग्य विभागाकडे लक्ष न देणाऱ्या खासदार आणि वर्तमानपत्राच्या संपादकाला ऐन अधिवेशनाच्या तोंडावर आरोग्य विभागातील भ्रष्टाचार दिसला. त्यांना याचे स्वप्न पडले की काय? माहित नाही, पण आम्हीही गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण करतो. या आरोपामागील धनी कोण? ते लवकरच समोर येईल. जे आरोप केले त्याचे उत्तर देण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलावली नसल्याचे सांगून त्यांनी हा मुद्दा गौण असल्याचे स्पष्ट केले.

    यावेळी डॉ. सावंत यांनी आरोग्य विभागातील आजवर राबविलेल्या योजना आणि भविष्यातील निर्णयामुळे आरोग्याचा चेहरामोहरा बदलविल्याचा विश्वास व्यक्त केला. आरोग्य विभागाशी निगडीत जेवढ्या समस्या निर्माण झाल्या, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमोर मांडल्या. त्यांनी या समस्या सोडविण्याच्या दिशेने प्रतिसाद दिल्यामुळे समस्या कमी होत आहेत.

    रुग्णालयांमध्ये औषधांच्या तुटवड्यासंदर्भात वावड्या उठल्या. यावर डॉ. सावंत यांनी ओपीडी आणि आयपीडीमध्ये रुग्णांची संख्या वाढल्यामुळे हा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगितले. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी औषधांची खरेदी करण्याचे अधिकार दिले आणि आज कुठेही औषधांचा तुटवडा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.