लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढली तर ४८ पैकी ४५ जागा जिंकेल – संजय राऊत यांचे भाकीत

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार २७ नोव्हेंबर रोजी दोन वर्षांचा टप्पा पूर्ण करत तिसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. या सरकारच्या स्थापनेत महत्वाची भूमिका पार पाडणारे शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी सरकार पाच वर्ष पूर्ण करेल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

  मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत(Loksabha Election) महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi) एकत्र लढली तर महाराष्ट्रात ४८ पैकी ४५ जागा महाविकास आघाडी जिंकेल, असे भाकीत खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी केले आहे. महाविकास आघाडी सरकार २७ नोव्हेंबर रोजी दोन वर्षांचा टप्पा पूर्ण करत तिसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. या सरकारच्या स्थापनेत महत्वाची भूमिका पार पाडणारे शिवसेनेचे नेते खा संजय राऊत यांनी सरकार पाच वर्ष पूर्ण करेल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

  ठाकरे आणि पवार एकत्र आले तर राजकारण बदलेल
  दूरचित्रवाहिनीला मुलाखत देताना राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छेखातर शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र आले त्यामुळे उद्धव ठाकरे अडीच वर्षांचे मुख्यमंत्री नव्हेत आमची बांधिलकी पाच वर्षाची आहे. २०२४च्या निवडणुकीतही ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असे कोणतेही समीकरण ठरले नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे आणि पवार एकत्र आले तर देशाचे राजकारण बदलेल. ती इच्छा मी पूर्ण केली.

  …तर महाराष्ट्रात ४८ पैकी ४५ जागा
  राऊत म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत महविकास आघाडी एकत्र लढली तर महाराष्ट्रात ४८ पैकी ४५ जागा महाविकास आघाडी जिंकेल, असे भाकीत देखील राऊत यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वाद होतात. युतीत होतो तेव्हा आम्ही महापालिकेत वेगळे लढलो. तिथे धोरणात्मक निर्णयही असतात. तिन्ही पक्षांचे वाटप अडचणीचे असते. कार्यकर्त्यांना सामावून घेता येत नाही, असे सूचक वक्तव्य करत त्यांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.

  सत्ता आली तर पुन्हा कृषी कायदे आणतील
  पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी कायदे परत आणू शकतात,असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी झुकत नाहीत. जनतेसमोर तर कधीच नाही. शेतकरी चिरडून मारले, लाठीमार झाला. कधी कृषी कायदे मागे घेतले ? १३ राज्यातील पोटनिवडणुकीत पराभव झाला. इतर राज्यात नुकसान होईल या भीतीने निर्णय घेतला. दुर्दैवाने उत्तर प्रदेशामध्ये सत्ता आली तर पुन्हा कायदे आणतील  अशी भीती देखील राऊत यांनी व्यक्त केली.