“हा षडयंत्राचा भाग असू शकतो” दुसऱ्या टप्प्यातील मतदानावर संजय राऊत यांचा गंभीर आरोप

प्रत्येक टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील. 35 प्लसच आमचं टार्गेट आहे” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

    मुंबई – लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. त्यातील आठ जागांसाठी आज मतदान होणार आहे. यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी विजयाचा दावा केला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे. सर्व जागा आम्ही जिंकणार” असे म्हणत “प्रत्येक टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील. 35 प्लसच आमचं टार्गेट आहे” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

    निवडणुकीच्या यंत्रणेत मोदी कृत भाजपाचे षडयंत्र 

    दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेमध्ये अनेक EVM मशीन बंद पडल्या आहेत. माध्यमांशी संवाद साधत संजय राऊत यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. संजय राऊत म्हणाले, “हे वारंवार होतं किंवा केलं जाईल. अमरावतीमध्ये तर कुठेही अघोरी कृत्य होऊ शकेल. वर्ध्यामध्ये भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे ईव्हीएम मशीन बंद पडणं आणि मतदारांना खोळंबायला लावणं आणि मग मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवणं हा षडयंत्राचा भाग असू शकतो आणि संध्याकाळ नंतर त्या ईव्हीएम मशीन चालू होतात आणि नंतर ज्यांना हव्या आहेत, त्या झुंडी तिथे उभ्या राहतात. सकाळी येणाऱ्या मतदारांना ना उमेद करणं हे या निवडणुकीच्या यंत्रणेत मोदी कृत भाजपाचे षडयंत्र आहे” असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

    त्यांचा वचननामा म्हणजे फेक नामा

    त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाच्या जाहीरनाम्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “बेरोजगारांना रोजगार देणं. गुजरातमधील पळवलेले उद्योग परत आणणं. महिला सबलीकरण, शिक्षण, आरोग्य, दहशतवादावरती उपायोजना अशा अनेक भूमिका ज्या वचनाम्यात घेतलेल्या आहेत, त्याला विरोध आहे का?” असा सवाल संजय राऊत यांनी केला. “मोदींनी जे गेल्या दहा वर्षात यु टर्न घेतलेले आहेत, त्यांचा वचननामा म्हणजे फेक नामा आहे. आम्ही प्रथमच आमचा वचननामा तीन पक्ष एकत्र आल्यावर जाहीर केला. यांना पोटदुखी आहे, यांना सहन होत नाही” असं संजय राऊत म्हणाले.