संजय राऊतांचा हल्लाबोल; शिवरायांच्या अपमानाचा विषय मागे पडावा म्हणून बोम्मईंनी सीमावाद काढला

संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र बंदची हाक दिली असून या संदर्भात त्यांनी मविआच्या नेत्यांची भेट घेतल्याचे सांगितले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रावर जो अचानक हल्ला केला, त्या मागे मोठे कारस्थान असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

    मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कर्नाटकच्या (Karnataka) मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवरायांचा अपमानाचा विषय मागे पडावा म्हणून भाजपचे (BJP) हे कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला, तर बोम्मईंना (Basavaraj Bommai) स्क्रिप्ट दिली त्याप्रमाणे ते बोलत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

    संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) महाराष्ट्र बंदची हाक दिली असून या संदर्भात त्यांनी मविआच्या (MVA) नेत्यांची भेट घेतल्याचे सांगितले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रावर जो अचानक हल्ला केला, त्या मागे मोठे कारस्थान असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्रामध्ये भाजपकडून जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला. यात भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी असो की राज्यपाल, यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चिखलफेक केली आहे.

    महाराष्ट्रात सरकारविरोधात संतापाची लाट ऊसळली आहे. हा सर्व विषय मागे पडावा म्हणून बोम्मईंना पुढे करत सीमा भागातील गावांवर हक्क सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकांनी दुसऱ्या विषयाकडे वळावे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान विसरावा यासाठी हे वक्तव्य करण्यात आले आहे. संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राची एकही इंच जागा कुणाला देणार नाही, सरकार दुबळे असले तरी इकडे शिवसेना आहे. बाळासाहेबांनी यासाठी ३ महिने तुरुंगवास भोगाला आहे. शिवसेनेने ६९ हुतात्मे दिले आहेत, याची आठवणही संजय राऊत यांनी करून दिली आहे.