विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका घेण्यास घाबरतात अन्…; भाजपच्या विजयाच्या दाव्यावरून संजय राऊतांचा टोला

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सोशल मीडियाद्वारे राज्यात आपल्या पक्षाचे सर्वाधिक सरपंच विजयी झाल्याचे सांगितले आहे. तसेच भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी कॉँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीला सर्वाधिक मतदान झाल्याचा दावाही केला आहे. त्यावरुन शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे.

  मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रविवारी, (5 ऑक्टोबर) झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांची सोमवारी, (6 ऑक्टोबर) मतमोजणी झाली. मतमोजणीनंतर राज्यातील सर्वच पक्षाचे नेते आपापल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाचा दावेदार झाल्याचे सांगत होते. त्यातही, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सोशल मीडियाद्वारे राज्यात आपल्या पक्षाचे सर्वाधिक सरपंच विजयी झाल्याचे सांगितले आहे. तसेच भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी कॉँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीला सर्वाधिक मतदान झाल्याचा दावाही केला आहे. त्यावरुन शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे.

  एका बातमीचा फोटो राऊतांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर पोस्ट केलाय. हा फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिलंय की, “काळ मोठा कठीण आला आहे. राज्य अडानी लोकांच्या हाती गेले आहे. निवडणुका आम्हीच जिंकल्याचा दावा बरेच गटतट करत आहेत.”

  राऊत नेमकं काय म्हणाले?

  “या निवडणुका पॅनल पद्धतीने लढवल्या जातात. पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाहीत. त्यामुळे आम्हीच जिंकलो हा दावा पोकळ आहे. हे लोक विद्यापीठाच्या सेनेट निवडणुका घेण्यास घाबरतात.”, असं संजय राऊत म्हणाले.

  हास्य जत्राच!

  पुढे सरकारची खिल्ली उडवत संजय राऊतांनी म्हटलं की, “मुंबई सह 14 महानगर पालिकांच्या निवडणुका घ्यायला यांची हातभर फाटते. ते ग्रामपंचायत निवडणुका आम्हीच जिंकल्याचा गुलाल उधळत आहेत. याला काय म्हणावं? हास्य जत्राच!”