Sanjay Raut's direct warning to BJP

    संजय राऊतांनी चंद्रशेखर बावनकुळेंचा कॅसिनोमधील फोटो ट्विट करीत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. बावनकुळेंनीसुद्धा यावर  रिट्विट करीत प्रत्त्त्युत्तर दिले होते. आता परत संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवत मोठा दावा केला आहे.

    कॅसिनोत साडेतीन कोटी डॉलर उधळले

    तेलगीने रात्रीत एका बारमध्ये १ कोटी रुपये उधळल्याची माहिती होती. पण, मकाऊमध्ये महाराष्ट्रातील एक व्यक्ती कॅसिनोत साडेतीन कोटी डॉलर उधळतो. म्हणजे खऱ्या अर्थाने अच्छे दिल आले आहेत, असे म्हणत शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष्य केले आहे.

    बावनकुळेंवर हल्लाबोल

    संजय राऊत यांनी ‘एक्स’ अकाउंटवर चंद्रशेखर बावनकुळे यांचे कॅसिनोतील फोटो ट्वीट केले होते. यानंतर कुटुंबाबरोबर असल्याचे बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिले होते. अशातच संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळेंवर हल्लाबोल केला आहे.

    “कुटुंबाबरोबर असल्याचे सांगितलं जात आहे, मग…”
    संजय राऊत म्हणाले, मी कुणाच्याही व्यक्तिगत आनंदावर विरजण घालू इच्छित नाही. पण, महाराष्ट्रात सामाजिक परिस्थिती काय आहे? आम्ही एखादी गोष्ट समोर आणल्यानंतर ट्रोलधाडीनं काहीतरी सांगायचे. मात्र, आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. कुटुंबाबरोबर असल्याचे सांगितले जात आहे. मग, फोटोत चिनी कुटुंब आहे का? जेवढे खोटे बोलाल, तेवढे फसाल.”

    “मी भाजपाचे दुकान बंद करणार नाही, कारण..”
    “माझ्याकडे २७ फोटो आणि ५ व्हिडीओ आहेत. मात्र, आमच्यात माणुसकी आहे. २७ फोटो आणि व्हिडीओ समोर आणले, तर भाजपाला दुकान बंद करावे लागेल. पण, मी ते करणार नाही. कारण, हे दुकान २०२४ पर्यंत चाललं पाहिजे,” असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.

    “आमच्याकडे मकाऊमध्ये ईडी आणि सीबीआय”
    “मी कधी कुणावरही व्यक्तीगत टिप्पणी करत नाही. आमच्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत. तुमच्याकडे महाराष्ट्रात ईडी आणि सीबीआय असेल. आमच्याकडे मकाऊमध्ये ईडी आणि सीबीआय आहे,” असेही संजय राऊतांनी म्हटलं.