आम्हाला गद्दार म्हणता, हिंमत असेल तर अजितदादांना गद्दार म्हणून दाखवा; संजय शिरसाट यांचे ठाकरेंना आव्हान

  मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मागील दोन वर्षात अभूतपूर्व बदल झाल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीमधील शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. त्यानंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटात हल्ले-प्रतिहल्ले झाले होते. उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटावर सातत्याने गद्दार म्हणत टीका करण्यात आली होती. तसेच, बंड आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाले आहे. मात्र, अजित पवार गटाला शरद पवार गटाकडून कोणीही गद्दार म्हटले नाही. यावरून शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे गटाला थेट आव्हान दिले आहे.

  अजितदादाला गद्दार म्हणून दाखवा, हिंमत आहे का?

  ठाकरे गटावर टीका करताना शिरसाट म्हणाले की, काहीही करून आता लोकांच्या मनावर परिणाम होणार नाही. आम्हाला गद्दार म्हणतात, अजितदादाला गद्दार म्हणून दाखवा, हिंमत आहे का? स्वतःचे घर भरण्यासाठी यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार विकले, त्यांनी काय लपवले, दडवले काही दिवसानंतर निश्चितपणे बाहेर येणार आहे.

  ठाकरे गटाकडे कार्यकर्ते नसतील पण पैसे…..

  दरम्यान ठाकरे गटाकडे कार्यकर्ते नसतील पण पैसे नाही असं आम्ही तरी म्हणू शकत नाही. आम्ही बरंच जवळून पाहिलं. त्यांना आउंटगोइंग नको फक्त इनकमिंग पाहिजे, खोके छोटा शब्द आहे, तिकडे कंटेनर आहेत. राज ठाकरे साहेब सुद्धा म्हणाले होते, असंही शिरसाट यांनी नमूद केलं

  काही लोकांना शरद पवार साहेबांची भूमिका कळत नाही

  दरम्यान, शरद पवार यांच्या अजित पवार आमचेच नेते आहेत, या विधानावर शिरसाट म्हणाले की, पवार साहेबांनी काही तासातच वक्तव्य बदलले, हा गोंधळ का सुरू आहे, कारण काही लोकांना शरद पवार साहेबांची भूमिका कळत नाही. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते म्हणाले होते की, विश्वासघात होऊ शकतो, तरी त्यांच्या साहेबांना हे कळत नाही. उद्धव ठाकरे यांनी याचा अभ्यास करावा आणि बडबड भोंग्याला लाथ मारून बाहेर काढावे. संजय राऊत म्हणतात हा गनिमी कावा आहे. अहो, हे अकलेचे तारे तोडत असल्याचा टोलाही शिरसाट यांनी लगावला.