muktai palkhi jalgaon

दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईच्या भेटीसाठी पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान संतश्रेष्ठ मुक्ताई माऊलीच्या दिंडीला दिला जातो. सुमारे तीन शतकांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा लाभलेल्या पालखी दिंडीची सुरवात कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथील संत मुक्ताईंच्या जुन्या मंदिरापासून करण्यात येते.

  मुक्ताईनगर: टाळमृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करीत आषाढी एकादशीच्या वारीसाठी जळगावमधील (Jalgaon) मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई पालखीचे (Sant Muktai Palkhi) आज पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने प्रस्थान होत आहे. या प्रस्थान सोहळ्यासाठी पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील भाविक सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्यांच्या वतीने आदिशक्ती मुक्ताबाईला पंढरपूर येथून आणलेल्या तुळशीचा हार अर्पण करण्यात आला. महाराष्ट्रातील सर्वांत लांब पल्ल्याची दिंडी म्हणून या दिंडीची ख्याती आहे. (Ashadhi Ekadashi Wari 2023)

  तीन शतकांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा
  दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईच्या भेटीसाठी पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान संतश्रेष्ठ मुक्ताई माऊलीच्या दिंडीला (Sant Muktai Dindi) दिला जातो. सुमारे तीन शतकांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा लाभलेल्या पालखी दिंडीची सुरवात कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथील संत मुक्ताईंच्या जुन्या मंदिरापासून करण्यात येते. आळंदीतून निघणारी संत ज्ञानेश्वरांची दिंडी, देहूतून निघणारी संत तुकोबांची दिंडी एवढेच महत्त्व जळगाव जिल्ह्यातून निघणाऱ्या संत मुक्ताईच्या दिंडीला देखील आहे. आषाढी एकादशीला पंढरपूरला विठ्ठल रखुमाईसह संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत तुकोबारायांच्या भेटीसाठी मुक्ताई या पालखीच्या माध्यमातून जातात, अशी वारकऱ्यांची भावना आहे.

  33 दिवसांत तब्बल 750 किलोमीटरचे अंतर कापणार दिंडी
  ही पालखी दिंडी कोथळी गावातील मुक्ताईंच्या जुन्या मंदिरापासून निघाल्यानंतर खानदेश, विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातून मार्गक्रमण करीत 33 दिवसांत तब्बल 750 किलोमीटरचे अंतर कापत आषाढी एकादशीला पंढरपूरात दाखल होते. तत्पूर्वी वाखरी येथील रिंगण सोहळ्यात संत मुक्ताईंची निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वरांसोबत बहीणभावाची भेट घडविली जाते. यावेळी संत मुक्ताईला साडीचोळीचा आहेर भावांकडून दिला जातो. पंढरपूरमध्ये मुक्ताई दिंडीला प्रथम प्रवेशाचा मान दिला जातो.

  हरिनामाच्या जयघोषाने मुक्ताईनगरी दुमदुमली
  मिळालेल्या माहितीनुसार आज आदिशक्ती मुक्ताईच्या मंदिरामध्ये पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. भाविकांची आदिशक्तीच्या दर्शनासाठी मोठी रांग लावली होती. हरिनामाच्या जयघोषाने मुक्ताईनगरी दुमदुमली आहे. संपूर्ण मुक्ताईनगरमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झालं आहे.