nivruttinath palkhi ringan

संत निवृत्तीनाथांची पालखी काल पळसे इथून निघून सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी गावात मुक्कामाला थांबली होती. आज लोणावरवाडीहून ती दातलीला रवाना झाली आहे.

    वारकऱ्यांच्या दिंडीचा पंढरीच्या (Pandharpur) दिशेने प्रवास सुरु आहे. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) इथून 2 जून रोजी निघालेली संत निवृत्तीनाथांची पालखी लोणारवाडीतील मुक्कामानंतर दातलीच्या दिशेने निघाली आहे. तर मुक्ताईनगर इथून निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी चिखली मुक्कामानंतर आज बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील भरोसा फाटा येथे विसावणार आहे.

    पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक विविध दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. त्र्यंबकेश्वरची संत निवृत्तीनाथांची पालखी (Nivruttinath Palkhi) आणि मुक्ताईनगरच्या (Muktainagar) कोथळी येथून निघालेली संत मुक्ताबाईंची (Sant Muktabai Palkhi) पालखी या दोन्ही पालख्या 2 जून रोजी पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. दरम्यान संत निवृत्तीनाथांची पालखी काल पळसे इथून निघून सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी गावात मुक्कामाला थांबली होती. आज लोणावरवाडीहून ती दातलीला रवाना झाली आहे. दुसरीकडे संत मुक्ताबाईंची पालखी काल चिखलीमध्ये मुक्कामाला होती. आज ती भरोसा फाट्याकडे चालू लागली आहे.

    नाथांची पालखी
    दरम्यान आज सकाळी संत निवृत्तीनाथांची पालखी लोणारवाडीतून निघून पंढरीच्या दिशेने निघाली. यावेळी नाथांच्या पालखीला ग्रामस्थांनी मोठ्या भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. यानंतर पालखीचे दुपारचे जेवण सिन्नर तालुक्यातील दातली इथे होणार आहे. याच ठिकाणी पालखीचं पहिलं गोल रिंगण पार पडणार आहे. आज जवळपास वीस किलोमीटरचं अंतर कापून संत निवृत्तीनाथ पायी दिंडी सोहळा सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी, मुसळगाव, दातली मार्गे खंबाळे गावामध्ये पोहोचणार आहे. तर 08 जून रोजी संत निवृत्तीनाथ पायी दिंडी पारेगाव येथे मुक्कामाला जाणार आहे.

    मुक्ताबाईंच्या पालखीचा मुक्काम
    संत मुक्ताबाई (Sant Muktabai Palkhi) आषाढी पालखी पायी दिंडी सोहळा काल चिखली गावात मुक्कामी होता. आतापर्यंत पाच दिवसात या पालखीने शंभरपेक्षा जास्त किलोमीटरचं अंतर पार केलं आहे. तब्बल 600 किलोमीटरचा पायी प्रवास असून 25 दिवसांत राज्यातील सहा जिल्ह्यांतून मार्गस्थ होत मुक्ताई पालखी दिंडी पंढरपुरात दाखल होते. सर्वात लांब पल्ल्याची मुक्ताबाईंची दिंडी शुक्रवारी श्रीक्षेत्र कोथळीमधून पंढरपूरकडे निघाली. पालखीचा पहिला मुक्काम नवे मुक्ताई मंदिर इथे झाला. त्यानंतर पाच दिवसांपासून मुक्ताई पालखीचा पायी प्रवास सुरु आहे. आज सकाळी चिखली येथून निघाल्यानंतर दुपारी बेराला फाटा येथे दुपारचे जेवण करुन त्यानंतर आजचा मुक्काम भरोसा फाटा येथे असणार आहे.