तुकोबांच्या शिळा मंदिराचा जीर्णोद्धार; उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून, या दैदिप्यमान अशा शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा मंगळवारी (दि. १४) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते संपन्न होत आहे. या सोहळ्याला वारकरी संप्रदायासह विविध क्षेत्रातील दिग्ग्ज मंडळी उपस्थित राहणार आहेत.

  देहूरोड : संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा (Sant Tukaram Maharaj Temple) जीर्णोद्धार करण्यात आला असून, या दैदिप्यमान अशा शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा मंगळवारी (दि. १४) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते संपन्न होत आहे. या सोहळ्याला वारकरी संप्रदायासह विविध क्षेत्रातील दिग्ग्ज मंडळी उपस्थित राहणार आहेत.

  शिळा मंदिराविषयी…

  रामेश्वर भटाने संत तुकाराम महाराजांच्या गाथा मस्यांचा डोह या ठिकाणी इंद्रायणी नदीत बुडविल्या होत्या. त्याच इंद्रायणी नदीच्या काठी संत तुकाराम महाराजांनी शिळेवर बसून १३ दिवस अनुष्ठान केले.  तुकोबांच्या वैकुंठगमानंतर त्यांच्या वंशजांनी मुख्य देऊळ वाड्यात शिळा मंदिर बांधले. तिथे तुकोबा ज्या शिळेवर बसून १३ दिवस उपवासी राहिले. ती शिळा आणून या मंदिरात बसविण्यात आली.

  तसेच तिथे संत तुकोबांचा मुखवटा ठेवण्यात आला. त्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही शिळा आहे. त्यामुळे या शिळा मंदिराचा देहू संस्थांच्यावतीने जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिराचे भूमिपूजन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. तर आज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे लोकार्पण होत आहे.

  नूतन शिळा मंदिर

  नव्याने उभा राहिलेले हे शिळा मंदिर पूर्णपणे काळ्या दगडात बांधले आहेत. मंदिरात बसविण्यात येणारी संत तुकाराम महाराजांची मूर्ती नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आली असून, तिच्या पाठीमागे प्राचीन शिळा बसविण्यात आली आहे. या मंदिराला दोन सुवर्ण कळस, मंडपाच्या कळसासह मंदिराच्या चार कोपऱ्यावर चार कळस, तर मंदिराच्या चारही दिशांना २८ कळस बसविण्यात आले आहेत. मंदिराच्या मंडपामध्ये श्री संत जिजाबाईंचे  तत्कालीन तुळशी वृंदावन देखील बसविण्यात आले आहे. अशा प्रकारे या शिळा मंदिराचा कायापालट झाला आहे.