लष्कर भागात सराफावर धारधार हत्याराने वार; ‘या’ कारणावरुन केला हल्ला

लष्कर भागातील सेंटर स्ट्रिट रस्त्यावर एका सराफावर भरवर्दळीच्या वेळी धारधार हत्याराने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.

    पुणे : लष्कर भागातील सेंटर स्ट्रिट रस्त्यावर एका सराफावर भरवर्दळीच्या वेळी धारधार हत्याराने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.

    सराफाने कामावरून काढून टाकल्याच्या रागातून हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. विजय विमलचंद मेहता (वय ३८, रा. लष्कर) असे जखमी झालेल्या सराफाचे नाव आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात त्यांचा भाऊ मनोज मेहता यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा भाऊ विजय मेहता यांचे लष्कर परिसरात सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते शनिवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून त्यांच्या घरी निघाले होते. तेव्हा इन कापड दुकानासमोर आल्यानंतर अचानक पाठिमागून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांना अडविले. तसेच, त्यांच्यावर धारधार हत्यारे वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

    दरम्यान, वर्दळीच्या वेळी घटना घडल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी येथे धाव घेतली. परंतु, आरोपी तेथून पसार झाले होते. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आरोपींना त्यांना कामावरून काढून टाकल्याचे समोर आले आहे. त्यातील एकाला ताब्यात घेतले असून, एकजन फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.