
पुणे : ससून रुग्णालयात उपचाराच्या बहाण्याने दाखल होत रुग्णालयातूनच ड्रग्स रॅकेट चालविणारा ड्रग्ज माफिया तसेच पुणे पोलिसांना चकवा देऊन रुग्णालयातून पसार झालेल्या ललित पाटीलप्रकरणात शहर पोलीस दलातील २ पोलीस कर्मचार्यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. युनिट दोनच्या पथकाने दोघांना अटक केली असून, कर्तव्यात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केला. याघटनेने शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
२ कोटी १४ लाखांचे ड्रग्ज पकडले
पोलीस नाईक नाथाराम काळे आणि अमित जाधव, अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही मुख्यालयातील कोर्ट कंपनीत कर्तव्यास होते. दीड महिन्यांपूर्वी गुन्हे शाखेने ससून रुग्णालयाच्या गेटजवळ २ कोटी १४ लाखांचे ड्रग्ज पकडले होते. याप्रकरणात कॅन्टिन बॉय तसेच ड्रग्ज नेण्यास आलेल्या दोघांना पकडले होते. काही वेळातच ड्रग्जचा मास्टर माईंड उपचार घेणारा कैदी ललित पाटील असल्याचे समोर आले होते. त्यामुळे अनेकांचे धांबे दणाणले होते.
पोलिसांनी १४ जणांचे रॅकेट उघडकीस आणले
दरम्यान, दुसऱ्याच दिवशी ससून रूग्णालयात उपचार घेत असतना ललित सोयीनुसार पळून गेला होता. यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. त्यानंतर याप्रकरणात पोलिसांनी १४ जणांचे रॅकेट उघडकीस आणले. दरम्यान, ललितच्या शोधासाठी संपुर्ण पोलीस दलाने कंबर कसली होती. त्याला मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी अखेर परराज्यातून अटक केली. त्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत झाली.
ललित पाटीलचे ससून रुग्णालयातून पलायन
न्यायालयाच्या परवानगीने ललित पाटीलला पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन पुण्यात आणले. त्यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. सध्या त्याच्याकडे तपास सुरू करण्यात आला आहे. टोळीवर मोक्का लावला आहे. दरम्यान, ललित पाटील याने ज्या दिवशी ससून रूग्णालयातून पलायन केले त्या दिवशी ससून रूग्णालयात बंदोबस्तावर पोलीस नाईक नाथाराम काळे आणि अमित जाधव हे या मुख्यालयातील कोर्ट कंपनीच्या पोलीस होते. तपासात दोघांचा सहभाग व निष्काळजीपणा दिसून आल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे कसून तपास केला जात आहे.