साताऱ्याचा यावर्षीचा उच्चांकी पारा; मंगळवारी 38.9 अंश कमाल तापमानाची नोंद

राज्यातील महत्वाच्या शहरामध्ये गेल्या दोन दिवसांत तापमानाचा पारा वाढला आहे. सातारा जिल्ह्यात तर उष्म्याचा पारा वाढल्याने उन्हाच्या झळा आणि चटक्यांनी सातारकर त्रस्त झाले आहेत. मंगळवारी ३८.९ अंश कमाल तापमानाची नोंद झाली.

    सातारा : राज्यातील महत्वाच्या शहरामध्ये गेल्या दोन दिवसांत तापमानाचा पारा वाढला आहे. सातारा जिल्ह्यात तर उष्म्याचा पारा वाढल्याने उन्हाच्या झळा आणि चटक्यांनी सातारकर त्रस्त झाले आहेत. मंगळवारी ३८.९ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. हे या नवीन वर्षातील आतापर्यंतचे उच्चांकी तापमान ठरले. त्यामुळे सातारचा पारा लवकरच ४० अंशाचाही टप्पा पार करण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. वैशाख वणव्यात तर आणखी तापमान वाढण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे.

    एप्रिल महिन्यापूर्वीच तापमानाचा उच्चांकी पारा दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांच्या जीवाची काहिली होवू लागली आहे. उष्माघाताचे प्रकारही वाढण्याचे संकेत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. दुपारच्यावेळी उन्हात फिरु नये, असाही सल्ला देण्यात आला आहे. दि. १८ मार्च ३५.५, १९ मार्च ३६, २० मार्च ३५.८, दि. २१ मार्च ३६, २२ मार्च ३७, २३ मार्च ३७.२, दि. २४ मार्च ३८.५, २५ मार्च ३८.४ आणि दि.२६ मार्च ३८.९ पर्यंत नोंदवण्यात आले आहे. हे तापमान पुढील महिन्यात आणखी वाढण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.

    सातारा शहराचे उन्हाळ्यातील कमाल तापमान ४२ अंशापर्यंत जाते. तर बहुतांशीवेळा पारा हा ४० अंशाच्या आतच असतो. पण, यंदा मार्च महिन्यापासूनच सूर्यदेव कोपू लागला आहे. त्यामुळे सातारा शहरासह जिल्ह्यातही प्रखर उष्णता जाणवू लागली आहे. सकाळी नऊपासूनच उन्हाची तीव्रता वाढत जाते. तर दुपारी १२ नंतर कडाक्याचे ऊन पडत जाते. परिणामी, घराबाहेर पडणेही अवघड होऊन जात आहे. त्यातच मागील चार दिवसांत दररोज पारा वाढत गेला आहे. तीन दिवस तर सातारा शहराचे कमाल हे ३८ ते ३९ अंशादरम्यान राहिले आहे. मंगळवारी ३८.९ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. हे या नवीन वर्षातील उच्चांकी पारा ठरला आहे.

    सातारा शहर उन्हामुळे तापल्याने दुपारच्या सुमारास रस्त्यावर वाहतूकची वर्दळही कमी दिसू लागल्याने रस्ते निर्णनुष्य होवू लागले आहेत. नागरिकही घरातच थांबणे पसंद करतात. त्यामुळे बाजारपेठेत तुरकळक प्रमाणात ग्राहक दिसून येतात. मात्र, सायंकाळी पाचनंतर नागरिक घराबाहेर पडून खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे. तर पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यातील पारा सातारा शहरापेक्षा अधिक नोंद होत आहे. यामुळे दुपारच्या सुमारास गावे ओस पडत असल्याचे चित्र आहे.

    तर ग्रामस्थ दुपारच्या सुमारास एखाद्या झाडाखाली थांबणे पसंद करत आहेत. त्याचबरोबर उन्हाच्या कडाक्यामुळे शेतीच्या कामावरही परिणाम झालेला आहे. सकाळी ११ पर्यंत आणि सायंकाळी चारनंतर शेतीची कामे उरकण्याकडे कल दिसत ओ.