भाजपच्या चक्रव्यूहात राष्ट्रवादीची गोची; सातारा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी अतुल भोसलेंकडे

भारतीय जनता पार्टीने सातारा लोकसभा मतदारसंघाचे राजकीय मजबुतीकरण करण्यासाठी जिल्ह्यातून डॉ. अतुल भोसले (Dr. Atul Bhosale) यांची लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे.

  कराड / पराग शेणोलकर : भारतीय जनता पार्टीने सातारा लोकसभा मतदारसंघाचे राजकीय मजबुतीकरण करण्यासाठी जिल्ह्यातून डॉ. अतुल भोसले (Dr. Atul Bhosale) यांची लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. नव्या दमाच्या अभ्यासू व संघटन कौशल्य असलेल्या डॉ. भोसले यांना संधी मिळाल्याने भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, उर्जित अवस्था निर्माण झाली आहे. दरम्यान, भाजपच्या चक्रव्यूहात ग्रुफटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मात्र सर्वदूर चिंतेचे वातावरण आहे.

  माढा लोकसभा खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे अशी दिग्गज नेतेमंडळी भाजपच्या गोटात दाखल झाल्याने जिल्ह्यात बोलबाला असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आपल्या अस्तित्वाची काळजी लागली आहे. तर शिवसेना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, महेश शिंदे हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर अंतर राखून आहेत.

  राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले आमदार शशिकांत शिंदे पक्षांतर्गत कुरघोडीने काहीसे अडगळीत पडले आहेत. तर राज्याचे सहकार तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे निष्क्रीय, अकार्यक्षम व स्वार्थी मंत्री असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी करत घरचा आहेर दिला आहे. सहकारमंत्र्यांच्या कारभाराबद्दल थेट पवारांना पत्र लिहून त्यांच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनावर प्रभाव असणाऱ्या नेतृत्वाची कमतरता राष्ट्रवादी काँग्रेसला भेडसावत आहे. जिल्हावार एकछत्री अंमल प्रस्थापित करण्यासाठी सातारा जिल्ह्याचे नेतृत्व सक्षम नेत्याकडे यावे यासाठी कार्यकर्त्यांच्यात चुळबूळ सुरू झाली आहे.

  राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कारभाराबद्दल पवारांना लिहिलेल्या पत्राने पक्षीय पातळीवर आता तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी कणखर नेतृत्व असेल तरच जिल्हा परिषद, पंचायत समिती अथवा नगरपालिका निवडणुकीत पक्ष एकदिलाने पुढे जाणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पाटील यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या हातात हात घालत पक्षीय धोरणाला खो घातल्याची चर्चा आजही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नजरेतून ही बाब निश्चितच सुटली नसणार.

  दरम्यान, सर्वच पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपली चाल चालत आहेत. याची रंगीत तालीम ही होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकात आपली ताकत आजमावून पाहण्यात सर्वच पक्ष व नेते व्यस्त आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हयाचे नेतृत्व करताना अतिशय सावध पावले टाकावी लागणार आहेत.

  पक्षवाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणारे भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्याकडे सातारा जिल्हा लोकसभा मतदार संघाच्या प्रभारी पदाची जबाबदारी आल्याने जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत उर्जित अवस्था आली आहे. या नियुक्तीने कराड तालुक्यातील राजकारणालाही कलाटणी मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पडद्यामागे राहून आघाडीतील उमेदवाराला ताकद देणाऱ्या भोसले यांना सर्व पातळीवर पक्षाचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे होऊ घसतलेल्या नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत आता भोसले याची भूमिका काय राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

  भविष्यात लोकसभेची संधी…

  भारतीय जनता पार्टीने डॉ. अतुल भोसले यांची नियुक्ती करून त्यांच्यावर मोठा विश्वास टाकला आहे. त्यांचे संघटन कौशल्य आणि कामाचे चिकाटी या जोरावर जिल्ह्यात भविष्यातील लोकसभेचा उमेदवार म्हणून अतुलबाबांकडे पाहिले जात आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या स्थनिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकांमध्ये आपल्या कामाची पोच दाखवण्याची नामी संधी डॉ. भोसले यांना मिळाली आहे, या संधीचे डॉ. भोसले सोने करणार का? येणारा काळच ठरवेल.