अजिंक्यतारा किल्ल्यावर आढळला मुलीचा मृतदेह; शेजारीच पडला होता मृतअवस्थेतील बिबट्या

महिन्यापासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला आहे. युवतीच्या मृतदेहाशेजारी बिबट्याही मृतअवस्थेत सापडला.

    सातारा : सातारा शहरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महिन्यापासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला आहे. साताऱ्यातील अजिंक्यतारा या किल्यावर मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. युवतीच्या मृतदेहाशेजारी बिबट्याही मृतअवस्थेत सापडला. अजिंक्यतारा गडावर नेमकं असं काय घडलं आणि दोघांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

    अजिंक्यतारा किल्ल्यावर एका महिन्यांपूर्वी संबंधित अल्पवयीन युवतीने उडी मारून आत्महत्या केली होती. उडी मारण्याआधी मुलीने विष घेतलं केलं आणि त्यानंतर तिने उडी मारल्याची माहिती समोर आली. अजिंक्यताराच्या पायथ्यावरून डोंगरात फिरण्यासाठी गेलेल्या काही जणांना संबंधित युवतीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर घटनास्थळी सातारा शहर पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले.

    पोलिसांना तपासादरम्यान, संबंधित युवती ही एक महिन्यापूर्वी सातारा शहरातून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. नागाठाणे परिसरातील ही अल्पवयी मुलगी आहे. बिबट्याचा त्याच ठिकाणी मृतदेह आढळल्याने विष प्राशन करून युवतीने उडी मारली त्यानंतर तो मृतदेह बिबट्याने खाल्ला असावा. आणि विषबाधेमुळे त्याचाही मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

    बिबट्याचा मृत्यू हा नेमका युवतीचा मृतदेह खाल्ल्याने झाला की तो फांद्यांमध्ये अडकल्याने झाला? याचा तपास पोलीस करत आहेत. संबंधित युवतीचा मृतदेह ज्या ठिकाणी होता तिथल्याच एका झाडावर बिबट्याचा मृतदेह आढळलाय. त्यासोबतच युवतीचे पैंजण, पाण्याची बॉटल आणि बॅग त्या ठिकाणी आढळून आली.