वाहनतळाच्या बांधकामासाठी १७ कोटींचा निधी पालिकेला मिळणार : पल्लवी पाटील

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील एसटी बस आगाराच्या जागेवर बहुमजली वाहनतळ बांधण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालिकेला केल्याची माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.

    महाबळेश्वर : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील एसटी बस आगाराच्या जागेवर बहुमजली वाहनतळ बांधण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालिकेला केल्याची माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली. या वाहनतळाच्या बांधकामासाठी साधारण 17 कोटी रूपयांचा निधी नगरविकास विभागाकडून पालिकेला मिळणार असल्याचेही पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

    महाबळेश्वर हे नावाजलेले थंड हवेचे ठिकाण असून येथे दरवर्षी साधारण वीस लाख पर्यटक भेट देतात. सलग सुट्टयामध्ये तसेच विविध हंगामात येथे पयर्टकांची गर्दी होते. या गर्दीमुळे महाबळेश्वर शहराकडे येणारे रस्त्यांवर त्याचप्रमाणे शहरात वाहतुकीची कोंडी होेते. ही कोंडी सोडविण्यासाठी पालिकेने काही वर्षापूर्वी येथील रे गार्डन परीसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज वाहनतळ बांधला आहे. परंतु, येथील गर्दी पाहता हे वाहनतळ अपुरे पडत आहे.

    सध्या पालिकेने शहरातील एकमेव बाजारपेठेचे सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. परंतु बाजारपेठेतील व्यापारी यांनी वाहनतळाची सोय प्रथम करा, असा आग्रह धरल्याने पालिकेने येथील एसटी बस आगारावर बहुमजली वाहनतळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी पालिकेला केल्या आहेत.