सातारा जिल्हा बँकेचे कामकाज इतर सहकारी बँकांना आदर्शवत : दिलीप वळसे-पाटील

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कामकाज इतर सहकारी बँकांना आदर्शवत असल्याचे सहकार व पणनमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दिलीप वळसे-पाटील यांचा बँकेमार्फत सत्कार करण्यात आला.

    सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कामकाज इतर सहकारी बँकांना आदर्शवत असल्याचे सहकार व पणनमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दिलीप वळसे-पाटील यांचा बँकेमार्फत सत्कार करण्यात आला.

    याप्रसंगी बँकेचे जेष्ठ संचालक व विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर, संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक प्रभाकर घार्गे, दत्तानाना ढमाळ, प्रदीप विधाते, रामराव लेंभे, सुरेश सावंत, संचालिका कांचन साळुंखे, ऋतुजा पाटील, मनोहर माळी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे विभागातील अधिकारी उपस्थित होते.

    दिलीप वळसे-पाटील म्हणाले, स्व .यशवंतरावजी चव्हाण, बाळासाहेब देसाई, रघुनाथराव पाटील, किसन वीर इत्यादी थोर नेत्यानी ग्रामीण भागाच्या विकासासाठी बँकेची स्थापना केली. बँकेच्या एकूणच कामकाजाची त्यांनी प्रशंसा केली. बँकिंग क्षेत्रात विशेतषतः बँकांना ग्रामीण क्षेत्रात व्यवसाय वाढीसाठी खूप संधी आहेत, त्याचा लाभ ग्रामीण भागातील ग्राहकांना बँकेच्या माध्यमातून होणे आवश्यक आहे.

    कर्ज देणे ठेवी स्वीकारणे या व्यतिरिक्त बँकेने सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन शेतकरी सभासदांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. बँकेने विविध प्रकारच्या कर्ज व ठेव येाजनांची आखणी करुन यशस्वीपणे राबविल्या आहेत. बँकेचे कामकाज पारदर्शक पद्धतीने चालते या सर्वाची प्रचिती म्हणजे बँकेच्या सर्वंकष कामाबाबत बँकेस मिळालेले १०० हून अधिक पुरस्कार होय.

    याप्रसंगी रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, बँकेची स्थापना स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलेली आहे. साहेबांचा कृषी विकासाचा संकल्प व कृषी औद्योगिकरणाचा ध्यास बँकेने आपल्या प्रत्येक योजनेत कार्यान्वित केलेला आहे. शेतक-याला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी बँकेने अनेक महत्वपूर्ण योजना यशस्वीपणे राबविलेल्या आहेत. बँक आज तळमळीने व निष्ठेने ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचली असून विविध प्रकारे बँक सामाजिक बांधिलकी जपत असलेचे नमूद केले.