मोदींना पाठिंबा देणारा साताऱ्याचा खासदार असेल! : धैर्यशील कदम

निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे काम सुरुच

    सातारा : नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पक्ष देशात ३५० हून अधिक खासदार निवडून आणणार आहे. मोदींना पाठिंबा देणाऱ्या खासदारांमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदारही असेल. साताऱ्याच्या जागेबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. साताऱ्याचा खासदार महायुतीचाच असेल, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी व्यक्त केला. येथील शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, भाजपचा कार्यकर्ता म्हणून भाजपचा खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गत पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला, त्याची सल आम्हाला आहे. साताऱ्याच्या जागेबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. सध्या भाजपचा बुथ स्तरावर काम सुरु आहे.

    नौसेना दिनाबाबत कदम म्हणाले, गेल्यावर्षी मोदी सरकाने नौसेनेच्या झेंड्यावर महाराजांची मुद्रा लावली होती. यावर्षी नौसेनेच्या प्रत्येक सैनिकाच्या गणवेशावर ही मुद्रा असणार आहे. या दोन्ही बाबी महाराष्ट्रासाठी अभिमानाच्या आहेत. गुलामगिरीचे प्रतीक असलेली ब्रिटिशधार्जिणी मुद्रा आता भारतीय सैनिक वागवणार नाहीत. मोदी सरकारने गुलामगिरीचे प्रतीक नष्ट केले आहे.