संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

गेल्या वर्षी मान्सूनचा पाऊस कमी झाल्यानं यंदा पाणी टंचाई जाणवेल, अशी शक्यता होती. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांतील (Kolhapur Water Issue) पाण्याची स्थिती 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये चांगली असल्याचा अहवाल समोर आला. जिल्ह्यातील सर्वच धरणात समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे.

    कोल्हापूर : गेल्या वर्षी मान्सूनचा पाऊस कमी झाल्यानं यंदा पाणी टंचाई जाणवेल, अशी शक्यता होती. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांतील (Kolhapur Water Issue) पाण्याची स्थिती 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये चांगली असल्याचा अहवाल समोर आला. जिल्ह्यातील सर्वच धरणात समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे.

    नुकत्याच जारी केलेल्या अहवालानुसार, राधानगरी आणि तुळशी धरणांत जवळपास गतवर्षी इतकाच, तर काळम्मावाडी धरणात एक टीएमसीनं अधिक पाणीसाठा आहे. सध्या राधानगरी धरणात २.०४ टीएमसी म्हणजेच २६.३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दूधगंगा धरणात ३.५६ टीएमसी म्हणजेच १४.८५ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. त्याचबरोबर वारणा धरणामध्ये ६.१० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मान्सूनचा पाऊस सुरू होईपर्यंत किमान पुढील दीड महिना पुरेल इतका पाणीसाठा तीनही धरणात आहे.

    शेतीसाठी १० जूनपर्यंत आणखी दोन आवर्तनं मिळण्याची शक्यता आहे. पाणीसाठा असाच राहिला आणि पावसाला लवकर सुरुवात झाल्यास शेतीसाठी उपसा बंदी करण्याची आवश्यकता भासणार नाही. सध्या तीनही धरणांतून विशिष्ट प्रमाणात भोगावती, दूधगंगा आणि तुळशी नदीत विसर्ग सुरूच आहे. त्यामुळं पिण्याच्या पाण्याची कमतरता नाही.

    आजअखेर काळम्मावाडी धरणात गेल्यावर्षीपेक्षा एक टीएमसीनं अधिक, तर राधानगरी आणि तुळशीत धरणात शंभर एमसीएफटी इतकाच कमी पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील धरणात समाधानकारक पाणीसाठा असला तरी शेती आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची पुढील काळातील गरज पाहता उपलब्ध पाण्याच्या वापराचं काटेकोर नियोजन करण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं केलं आहे.