सोनिया गांधींवरील ईडी कारवाई विरोधात नागपुरात काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन

भाजपने इडी आणि सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणाना हाताशी धरून देशातला विरोधी पक्ष संपवण्याचा घाट घातल्याचा आरोप नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे.

    नागपूर :  नॅशनल हेरॉल्डच्या प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांना नाहक अडकवण्याचा कट केंद्र सरकारकडून केला जात असल्याचा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी केला आहे. आज नागपुरात विलास मुत्तेमवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार व ईडीचा निषेध करण्यासाठी सत्याग्रह आंदोलन केले.

    बेस्ट हेअर प्रकरण फक्त शंभर कोटींचे असताना केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर ईडीने ते प्रकरण 5 हजार कोटीचे बनविल्याचा आरोप मुत्तेमवार यांनी केला. भाजपने इडी आणि सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणाना हाताशी धरून देशातला विरोधी पक्ष संपवण्याचा घाट घातल्याचा आरोप नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावल्या नंतर नागपूरच्या संविधान चौकावर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या वेळी मोदी सरकार आणि ईडीचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात काळ्या पट्ट्या लावल्या होत्या.या आंदोलनात माजी खासदार विलास मुत्तेमवार, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजीत वंजारी यांच्यासह सर्व महत्त्वाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.