
बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी आणि आमच्या कुटुंबाला काँग्रेस बाहेर ढकलण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले, असा गंभीर आरोप सत्यजीत तांबेंनी केला आहे.
नाशिक: नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. त्यानंतर अनेक आपोर प्रत्यारोप करण्यात आले. काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे यांचं पक्षातून निलंबनही झालं. मात्र, आता सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.
काँग्रेसबाहेर ढकलण्यासाठी षडयंत्र
“बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी आणि आमच्या कुटुंबाला काँग्रेस बाहेर ढकलण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले,” असा गंभीर आरोप सत्यजीत तांबेंनी केला आहे. ते शनिवारी (४ फेब्रुवारी) नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
सत्यजीत तांबे म्हणाले, “मी एक दोन पत्रकार परिषदेत ऐकलं की नाशिक पदवीधर मतदारसंघातून कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय तांबे कुटुंबाला घ्यायचा होता. मग बरोबर 12.30 वाजता दिल्लीतून माझ्या वडिलांची उमेदवारी का जाहीर झाली? माझे वडील सांगत आहेत की, मला उभं राहायचं नाही, माझ्या मुलाला उभं करायचं आहे, तर मग माझ्या वडिलांची उमेदवारी साडेबारा वाजता का जाहीर करण्यात आली.”
तांबे म्हणाले की,“ नागपुरातून मला चुकीचा एबी फॉर्म देण्यात आला, त्यावर खुलासा करण्यात आला. पण पक्षाचा अंतर्गत प्रश्न असून तो आतच मिटवावा अशी भूमिका मी घेतली. ते म्हणाले की, “मला पक्षाचा पाठिंबा हवा असेल तर त्यासाठी एक पत्र लिहायला लावलं. त्यानंतर मला त्यातून माफी मागायला सांगितली. मी पक्षामध्ये अनेक वर्षे काम केलं, त्यामुळे मी माफीही मागायला तयार झालो. एकीकडे मला माफी मागायला लावली आणि दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. हे माझ्यासाठी धक्कादायक होतं. मी दिल्लीशी संपर्क केला, तरीही मला पक्षाने पाठिंबा दिला नाही.”
स्क्रिप्टेड स्टोरी
“महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीतील एकाही जागेचा उमेदवार दिल्लीतून जाहीर झाला नाही. अमरावती, नागपूरमधील उमेदवारांचं नाव दिल्लीतून जाहीर झालं का? मग एकच उमेदवारी दिल्लीतून जाहीर का झाली ? हे सर्व एका षडयंत्राचा भाग आहे. ही ‘स्क्रिप्टेड स्टोरी’ होती. हे षडयंत्र बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी, सत्यजीत तांबेला उमेदवारी मिळू नये आणि आमच्या कुटुंबाला पक्षाबाहेर ढकलण्यासाठी रचलं गेलं असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही,” असे गंभीर आरोप सत्यजीत तांबेंनी केले.
भविष्यात अपक्षच राहणार
सत्यजीत तांबे पुढे म्हणाले की, मी या मतदारसंघातून अपक्ष निवडून आलो आहे, त्यामुळे यापुढेही मी अपक्षच राहणार आहे. मी काँग्रेस परिवारामध्ये वाढलो आहे, पण मला पक्षांतर्गत मत मांडण्याची संधी न देता माझ्याविरोधात कायम वक्तव्य केली गेली, त्यामुळे माझ्याकडे पर्याय राहिला नाही. मी काँग्रेस कधीही सोडली नाही, पण यापुढे अपक्ष म्हणून काम करणार आहे.
दरम्यान याविषयी नाना पटोलेंना विचारण्यात आल्यावर प्रवक्ते याविषयी बोलतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.